दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल
By admin | Published: April 1, 2017 01:49 AM2017-04-01T01:49:55+5:302017-04-01T01:49:55+5:30
चऱ्होलीतील तापकीरनगर भागात अद्याप ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध नसल्याने परिसरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात
भोसरी : चऱ्होलीतील तापकीरनगर भागात अद्याप ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध नसल्याने परिसरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याचीच दाखल घेत नगरसेविका विनया तापकीर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या भागातील नागरिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नागरिकांना तत्काळ ड्रेनेजची कामे पूर्ण करून द्यावीत अशी मागणी या वेळी तापकीर यांनी केली.
चऱ्होली भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवा अपूर्ण पडत असून काही परिसरात मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो.
ड्रेनेजअभावी सांडपाणी रस्त्यावर जागोजागी साचते. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. याचीच पाहणी करण्यासाठी नागसेविका विनया तापकीर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांनी महापालिका प्रशासन अधिकारी भोसले, गवळी व शितोळे यांना तापकीरनगर परिसरातील परिस्थिती दाखवली. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच लवकरात लवकर या भागात ड्रेनेज व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
तापकीरनगर भागात सुमारे १०० घरे असून, या भागात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे म्हणून भविष्याचा विचार करता येथे सर्व मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. ड्रेनेज व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव सांडपाणी इतरत्र सोडावे लागते. त्यामुळे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तत्काळ येथील ड्रेनेजची कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्ही नागरिकांसह जनआंदोलन करून आमच्या समस्या मांडणार आहोत.
- विनया तापकीर, नगरसेविका