जमिनीच्या भावामुळे बहिणीचा भाऊ दुरावला, सिमेंटच्या जंगलामुळे नात्यामध्ये निर्माण होतोय दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:09 AM2018-11-10T01:09:46+5:302018-11-10T01:10:12+5:30
भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचे पवित्र नाते घट्ट करणारा सण पूर्वीपासून शहरात व ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. परंतु...
वडगाव मावळ - भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचे पवित्र नाते घट्ट करणारा सण पूर्वीपासून शहरात व ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. पंरतु या सणाचे स्वरूप काही वर्षापासून बदलत चालले आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने बहिणीला जमिनीचा व संपत्तीचा हिस्सा नाकारणाऱ्या काही नगरगठ्ठ भावांमुळे या पवित्र सणात दुरावा आल्याचे दिसून येत आहे.
भाऊबीज सणाला भाऊ बहिणीला तिच्या सासरी जाऊन बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून साडी, मुलांना कपडे, म्हणून भेटवस्तू देतो, असे चित्र पूर्वीपासून दिसत आहे. परंतु अलीकडे काही वर्षापासून काही निगरगठ्ठ भावांनी या पवित्र सणाला बहिणींकडे जाण्याचे टाळले आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग असो या ठिकाणी जमिनीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. जिकडे तिकडे बांधकामे जोमात सुरू आहेत. काही जमीन मालकांनी स्वत:च्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकणे, अथवा ४० ते ६० टक्क्यांनी त्यांच्याशी भागीदारीत सदनिका, बंगले, रो-हाऊस बांधणे याकडे कल वाढला आहे. या जमिनींच्या व्यवहारासाठी वारस हक्काने बहिणीचे नाव लागल्याने तिच्या सहीला किंवा अंगठ्याला फार महत्त्व आले आहे. बहिणीला हिश्श्याचे पैसे न देणयासाठी काही निगरगठ्ठ भावांनी बहिणीचा तसेच तिच्या पतीला दमदाटी करून वारसा हक्काने उता-यावरील नावे कमी करण्यासाठी प्रयत्नही केला आहे. गेल्या काही वर्षात भाऊबीज सणाचे स्वरूप बदलले आहे.
पूर्वी खेड्यापाड्यात जायला वाहणांची सोय नव्हती. बहिणीकडे जाण्यासाठी बैलगाडीतून किंवा पायी जात असत. आता चालकाची व इतर वाहनांची सोय झाली आहे. जमिनींचे व्यवहार झालेल्या काही कुटुंबात बहिणीला कायदेशीररित्या तिचा समान हिस्सा असल्याने तसेच जमिनीची विक्री करताना काहीही न मागता सही केल्याने समजूतदार भावांकडून भाऊबीजेनिमित्त पुढे करून किमती साडीसह, सोन्याचे दागिने, चारचाकी किंवा दुचाकी वाहणे दिल्याची उदाहरणे आहेत.
काही बहिणींची संपत्ती हिस्सा न घेताच त्यांचे कायद्यानुसार जमिनीच्या उताºयावर नाव लागल्याने हिस्सा मागितल्याने काही स्वार्थ भावांनी भाऊबीजीला बहिणीकडे जाणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक बहिणींना भाऊबीजीसाठी दिवसभर भावाची वाट पाहून भाऊ न आल्याने अखेर रात्री चंद्रालाच ओवाळणे भाग पडल्याची उदाहरणे घडली आहेत.
काही बहिणींची संपत्ती हिस्सा न घेताच त्यांचे कायद्यानुसार जमिनीच्या उताºयावर नाव लागल्याने हिस्सा मागितल्याने काही स्वार्थी भावांनी भाऊबीजीला बहिणीकडे जाणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक बहिणींना भाऊबीजीसाठी दिवसभर भावाची वाट पाहून भाऊ न आल्याने अखेर रात्री चंद्रालाच ओवाळणे भाग पडल्याची उदाहरणे घडली आहेत. तर काही भाऊ पत्नीच्या माहेरकडील शेतीत हिस्सा मिळण्यासाठी कोर्ट कचेरी करून हिस्सा मिळविताना दिसत आहेत. मात्र हेच भाऊ बहिणीला हिस्सा नाकारत आहेत.