लिंक रोडवरील स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:22 AM2018-07-22T03:22:57+5:302018-07-22T03:23:26+5:30
रस्त्यावर कचरा फेकल्याने दुर्गंधीचा होतोय त्रास
पिंपरी : शहरातील चिंचवड लिंक रोड स्मशानभूमीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्मशानभूमीतील गैरसोर्इंसह परिसरात येणाऱ्या कुबट वासामुळे नागरिकांना अंत्यविधी करताना अडचणी येतात. येथील दहनशेड, निवाराशेड व स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.
लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. चिंचवड लिंक रस्त्याने स्मशानभूमीच्या वाटेला लागल्यावर गैरसोर्इंची मालिकाच सुरू होते. येथे सर्वधर्मीय स्मशानभूमी असा फलक लावला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. येथे कचरा डेपो झाल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागतो. येथे भटकी कुत्री व डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागतो. येथील कचºयाची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्मशानभूमीतील दहनशेडची चाळण झाली आहे. पत्र्यांना मोठमोठी छिद्र पडली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळते. शेडवरील पत्रे पूर्णपणे कुजले आहेत. पाऊस सुरू असताना अंत्यविधी करण्याची वेळ आली, तर मृताच्या नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. येथे चार दहनजाळ्या आहेत. त्याचप्रमाणे दहनखड्डेही आहेत. दहनजाळ्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या लोखंडी पट्ट्या वाकल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागते. स्मशानभूमी परिसरामध्ये जनावरे फिरत असतात. येथे विद्युतदाहिनी व विद्युत जाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजूलाच दफनभूमी आहे. मात्र देखरेखीचा अभाव असल्यामुळे
त्यांची दुरवस्था झाली आहे. दफनभूमीमध्येही मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.
आवश्यक सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे स्मशानभूमीमध्ये नागरिकांची गैरसोयच जास्त होते. वेळेत साफसफाई होत नसल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे. येथे नियमित सफाई कामगार नेमण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे. मात्र, प्रशासनानेही सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये भर पडत आहे.