पिंपरीतील एच.ए़ कंपनीला केंद्रसरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:31 AM2018-12-19T00:31:04+5:302018-12-19T00:31:19+5:30
सदानंद गौडा : श्रीरंग बारणे यांनी घेतली भेट; अधिकाऱ्यांसमवेत केली चर्चा
पिंपरी : हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या (एच.ए) प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या अधिकाºयांसमवेत बैठक बोलावली आहे. एच.ए़ कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. एच.ए. ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्यांचा पगार प्रलंबित असून, कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. दरम्यान, कंपनीला केंद्र सरकारकडून शंभर कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळाले होते. त्यात कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फार्टीलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबंधी कॅबिनेट कमिटीपुढे ४५० करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने कंपनीच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. याबाबत खासदार बारणे यांनी मंगळवारी संबंधित खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पिंपरीतील एच. ए कंपनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.