सेंट अॅण्ड्र्यूजची जेतेपदाची हॅट्ट्रिक
By admin | Published: September 9, 2016 01:15 AM2016-09-09T01:15:10+5:302016-09-09T01:15:10+5:30
महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय थ्रो बॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात चिंचवड येथील सेंट अॅण्ड्र्यूजने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद
पिंपरी : महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय थ्रो बॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात चिंचवड येथील सेंट अॅण्ड्र्यूजने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावीत यशाची हॅट्ट्रिक साधली. मुलांमध्ये आकुर्डी येथील म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळविले.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे गुरुवारी १९ वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयाने निगडीच्या सिटी प्राईड कनिष्ठ महाविद्यालयाचा १५-१२, १३-१५,१५-११ असा पराभव केला. चिंचवडच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाने चिंचवडच्याच फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत तिसरे स्थान मिळविले.
मुलींच्या गटात सेंट अॅण्ड्र्यूजने निगडीच्या सिटी प्राईडचा १५-१, १५-३ असा सहज पराभव करीत विजेतेपद पटकाविले. त्रिवेणीनगरच्या सेंट अॅन्स संघाने ताथवडेच्या ब्लॉसम पब्लिक स्कूलवर १५-३, १५-४ अशी मात करीत तिसरे स्थान मिळविले.
म्हाळसाकांतचे अखिलेश नाटेकर, ऋतिक कोळी, रोहन शिंदे, कश्यप पवार आणि सेंट अॅण्ड्र्यूजच्या ईशा गोगावले, ज्ञानदा राऊत, वृषाली पाटील, रोहिणी पवार यांनी चांगला खेळ करीत उपस्थितांचे मन जिंकले.
(वार्ताहर)