शहरात ‘पॉस’ मशिनद्वारे होतेय धान्यवाटप: रेशन दुकानातील काळाबाजारास बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:21 AM2017-09-09T02:21:27+5:302017-09-09T02:21:58+5:30
रेशन दुकानातून आता ग्राहकांना ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकल्प राबविला जात असून यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.
पिंपरी : रेशन दुकानातून आता ग्राहकांना ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकल्प राबविला जात असून यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.
निगडीतील परिमंडल कार्यालयात अ आणि ज विभाग असून अ विभागामध्ये १०६ तर ज विभागामध्ये ९४ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. या दुकानांमधून केवळ शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. मात्र, आता यापुढे ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जाणार आहे. ज्या दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकेतील नागरिकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहे. त्यानुसारच धान्य दिले जात आहे.
यासाठी दुकानदारांना पॉस मशिन देण्यात आले आहे. ज्यांची आधार नोंदणी आहे तितक्या लोकांचे धान्यवाटप केले जात आहे. याबाबतची माहिती पॉस मशिनमध्ये संकलित असेल. पॉस मशिनची सर्व माहिती आॅनलाइन ठेवली जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांची संपूर्ण माहिती युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती पॉस मशिनमध्ये असेल. पॉस मशिनसाठी आवश्यक असणारे कामकाज जवळपास पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, अद्यापही काही जणांनी आधार जमा केलेले नाहीत. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता तसे होणार नाही.
माहितीचे संगणकीकरण झाल्यास नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होणार आहे. तसेच पेपरलेस कारभार होण्यासही हातभार लागणार आहे. आॅनलाइन कामकाज करण्यासाठी या माहितीचे संगणकीकरण फायदेशीर ठरणार आहे.