तळेगाव दाभाडे येथे सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ ;सलग दुसऱ्या दिवशीही मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:38 PM2019-06-04T20:38:23+5:302019-06-04T20:40:27+5:30
राव कॉलनीतील घराकडे जात असताना एका ज्येष्ठ पादचारी महिलेच्या गळ्यातील ७०हजार रुपये किमतीचे गंठण आणि सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावली.
तळेगाव दाभाडे :.या संदर्भात सिंधू व्दारकानाथ निळकंठ (वय ६२, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .तळेगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अलंकार खेचण्याची घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनसाखळी चोरट्यांचा महिलांनी आता धसका घेतला आहे. चोरांना पोलिसांचे भयच उरले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सिंधू निळकंठ या मारुती मंदिर चौकातून पायी राव कॉलनीतील घराकडे सोमवारी रात्री जात असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची साखळी व सोन्याचे मिनी गंठण असा एकूण ७० हजार रुपये किमंतीचा ऐवज हिसकावला.नंतर त्यांनी दुचाकीवरून पलायन केले.परिसरातील सीसीटीव्ही चे फुटेज तपासण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.तळेगाव स्टेशन येथे रविवारी सायंकाळी चोरट्यांनी सोनाली मराठे या महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे ९२हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकाविले.तर सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री चोरट्यांनी सिंधू निळकंठ या महिलेच्या गळ्यातील गंठण आणि सोन्याची साखळी हिसकावली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय संकपाळ करीत आहे.