चाकणमधील जनावरांच्या बाजाराची दुरवस्था, पावसामुळे बाजारात गाळचगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 03:10 PM2018-07-15T15:10:38+5:302018-07-15T15:12:28+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील जनावरांच्या बाजारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ झाला असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अशा राड्यातच उभे राहून जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

Chakan cattle market disorders due to rains | चाकणमधील जनावरांच्या बाजाराची दुरवस्था, पावसामुळे बाजारात गाळचगाळ

चाकणमधील जनावरांच्या बाजाराची दुरवस्था, पावसामुळे बाजारात गाळचगाळ

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील जनावरांच्या बाजारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ झाला असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अशा राड्यातच उभे राहून जनावरे विकण्याची वेळ आली आहे. बाजाराची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे. ही कामे सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन लवकरात लवकर करण्याचे आश्वासन सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिले आहे. मात्र सचिवांचा मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून, चुकीचे धोरण राबवून काम केल्यास माझा विरोध राहील, असा इशारा संचालक राम महादू गोरे यांनी दिला आहे. 
 

शनिवारी (14 जुलै) भरलेल्या जनावरांच्या बाजारात पावसाच्या पाण्याने गाळ होऊन राडा झाला होता. काही खोलगट ठिकाणी पाणीही साचले होते. त्यामुळे जनावरे खरेदी-विक्रीसाठी आलेल्या व्यापारी व शेतकऱ्यांना गाळात ताटकळत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला. बाजारातून चालताना सगळा गाळ अंगावर उडत आहे. पावसामुळे झालेल्या राड्याने बाजारातील सगळे रस्तेच चिखलमय व निसरडे झाले आहेत. अशा रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा आला कि या समस्येला दरवर्षी सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. या बाजारात काँक्रिटीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापारी करत असतानाही हे काम अद्याप का होत नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शेतकरी व व्यापारी वर्गात याबाबत मोठी नाराजी आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सभापती चंद्रकांत इंगवले यांची भेट घेऊन बाजारातील समस्या मांडल्या असून या समस्या सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

याबाबत सभापती चंद्रकांत इंगवले म्हणाले, “बाजार समितीच्या एका संचालकाने हरकत घेतल्याने काँक्रिटीकरण व बाजार आवारातील इतर कामे रखडली आहेत. सदर कामे संबंधित संचालकाच्या सर्व समस्या ऐकून घेऊन लवकरात लवकर सोडविण्याचा बाजार समिती प्रयत्न करणार आहे.” 

याबाबत संचालक राम महादू गोरे यांनी सभापती चंद्रकांत इंगवले यांच्याकडे सचिव सतीश चांभारे यांच्या संदर्भात लेखी तक्रार केली आहे. राम गोरे म्हणाले कि, “सचिव सतीश चांभारे हे पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करीत आहेत. जनावरांच्या बाजाराबाबत दिशाभूल करून चुकीचे ठराव करण्याचे काम सचिव करून घेत आहेत. चाकण नगरपरिषदेने येथे जनावरांचा बाजार भरवू नये असे पत्राद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या १०० टक्के अनुदानातून रोहकल रोड या ठिकाणी खर्च केलेला आहे. तरीही सचिव चुकीचा विषय अजेंड्यावर घेऊन सर्व संचालकांना चुकीचा ठराव पास करण्यास भाग पाडत आहेत. त्यांस व उपबाजार आवारात म्हैस गोठे ऑफिससाठी गाळे बांधण्यास माझा विरोध आहे.” 

यासंदर्भात सचिव सतीश चांभारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
 
 

Web Title: Chakan cattle market disorders due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.