मावळ तालुक्यात 'चाले ऊन-पावसाचा खेळ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:04 AM2018-08-28T00:04:56+5:302018-08-28T00:05:38+5:30
मावळासह कामशेत व परिसरात पावसाचा जोर कायम असून श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळपासून काही काळ पावसाने उघडीप दिली.
कामशेत : मावळासह कामशेत व परिसरात पावसाचा जोर कायम असून श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळपासून काही काळ पावसाने उघडीप दिली. मात्र संततधार सुरूच होती. मागील काही दिवसांपासून पावसाने परिसरात धुवाधार बरसात केली आहे. शेतीची कामेही पूर्ण झाली आहेत. संततधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत आहे, शिवाय भात खाचरात पाणी साचल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. वडिवळे, आंद्रा, पवना व मावळातील इतर सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने धरणातून पावसाच्या प्रमाणानुसार पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी, पवना, कुंडलिका आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
शहरासह मावळात पावसाची संततधार सुरूच असून, इंद्रायणी, कुंडलिका, पवना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी पावसाने दिवसभर बरसात केली. मात्र सोमवारपासून पावसाचा ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. इंद्रायणी नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली असून या वाहत्या पाण्याच्या जास्त जवळ जाताना खबरदारी घ्यावी, अशी प्रशासनाने सूचना दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
४वडिवळे धरण परिसरात १ जून ते २७ आॅगस्टपर्यंतच्या काळात ३३२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच चोवीस तासांत २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडिवळे धरणाचा एकूण पाणीसाठा ४०.८७ दशलक्ष घनमीटर झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ३०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. वडिवळे धरण शंभर टक्के भरले असून या धरणाच्या पाण्याची पातळी ६३४ मीटर झाली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून ६८८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, पावसाचा जोर वाढल्यास पाणी सोडणे कायम राहील. याबाबत नदीपात्राच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वडिवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.