पिंपरीतील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत आधार कार्ड देण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 10:52 AM2020-12-29T10:52:55+5:302020-12-29T10:57:39+5:30
३१ मार्चपर्यंत नोंदणी अद्यावतीकरण पूर्ण करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सूचना
पिंपरी : शहरातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे अद्यापही बाकी आहे. राज्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरण ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत शिल्लक असलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरण करण्याचे आव्हान शिक्षण विभागावर आहे.
शहरातील ३ लाख १९ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५६ हजार ६६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही काढलेले नाही. पिंपरी विभागातील ४८.३० टक्के, तर आकुर्डी विभागातील ५२.३७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्र बंद होते. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ही आधार नोंदणी राहिलेली आहे. मार्चपासून शाळा बंद आहेत. आधार कार्ड काढण्याच्या मशीन उपलब्ध नाहीत. आदी कारणांमुळे आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणाचे काम रखडले आहे.
शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल संकेतस्थळावर उपलब्ध असावी. संबंधितांना लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी म्हणजेच एकच आधार; पण २ नावांचे वेगळे विद्यार्थी दाखविल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व विद्यार्थी आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण बंधनकारक केले आहे.
---
कोरोनामुळे आधार कार्ड काढण्याचे आणि अद्यावतीकरण करण्याचे काम राहिलेले आहे. मार्चपासून शाळाही बंद आहेत. शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका