विस्तारीत प्रभागाचे बंडोबांपुढे आव्हान
By admin | Published: February 17, 2017 05:00 AM2017-02-17T05:00:54+5:302017-02-17T05:00:54+5:30
महापालिकेची २१ फेब्रुवारी २०१७ ला होत असलेली ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची आहे. प्रभागांची फेररचना झाली.
पिंपरी : महापालिकेची २१ फेब्रुवारी २०१७ ला होत असलेली ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची आहे. प्रभागांची फेररचना झाली. ४० ते ५० हजार मतदार संख्येचे विस्तारलेले प्रभाग अपक्ष निवडणूक लढणाऱ्यांसाठी जिकिरीचे ठरू लागले आहेत. १२८ जागांसाठी ३२ प्रभागांत निवडणूक होत असून, एकूण ७७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील २३६ अपक्ष आहेत. विस्तारीत प्रभागात स्वत:च्या ताकतीवर प्रचार यंत्रणा राबविणे खर्चिक आणि न पेलविणारे असल्याने अनेक बंडखोर उमेदवार थंड पडले आहेत, तर काही जिद्द, चिकाटीच्या जोरावर निवडणूक रिंगणात तग धरून आहेत.
महापालिका निवडणुकीचे उमेदवारीअर्ज दाखल करण्याअगोदर विविध राजकीय पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. भाजपाकडे ४४८ इच्छुक, तर राष्ट्रवादीकडे ४७० इच्छुक होते. शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या २७२ इतकी होती. काँग्रेसकडे २५०, मनसेकडे १२५, आरपीआयकडे १०० इच्छुक होते. परंतु तिकीटे कापल्याने अनेकांनी बंडखोरी केली. (प्रतिनिधी)