गटबाजी, कुरघोड्या शमविण्याचे आव्हान
By admin | Published: June 8, 2015 05:20 AM2015-06-08T05:20:50+5:302015-06-08T05:20:50+5:30
शहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे.
पिंपरी-चिंचवड - वार्तापत्र
विश्वास मोरे
शहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे. हे अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजी मोडीत काढण्यात पक्षांच्या नेत्यांना यश मिळाले नाही, तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक राजकारणाचा फटका पक्षास बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना स्थानिक नेते, कार्यकर्ते, विविध गटांची मोट बांधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. पक्षप्रमुखांनाही या शहरात जातीने लक्ष द्यावे लागणार आहे.
विविध प्रांतातील लोकांमुळे शहरास मिनी इंडिया म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र, प्रमुख पक्षांचे राजकारण स्थानिक नेत्यांभोवती फिरत असते. विकासाऐवजी गावकी-भावकी, नातीगोती, व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले जाते. पक्षाला मोठे न मानता एकमेकांना शह देण्याची फोफावलेली वृत्ती यामुळे शहरातील प्रमुख पक्षांत मतभेद उफाळून येण्याचा अनुभव शहरवासीयांना येतो. त्यामुळे भविष्यात स्थानिक नेत्यांना कार्यपद्धती बदलावी लागणार आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना जोर लावावा लागेल.
कठोर भूमिका घेण्याची गरज
महापालिकेत राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता आहे. मात्र, वर वर दिसणारे हे चित्र तितकेसे खरे नाही. बंडखोर वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा पॅटर्न आता बदलावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना स्थानिक पातळीवरील गटबाजी मोडीत काढण्यासाठी कठोर व्हावे लागणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप भाजपात गेल्याने चिंचवडमधील राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. भाजपला ती मिळाली आहे. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे हेही कमालीचे नाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून यश मिळविले. त्यामुळे ते नक्की भाजपबरोबर की राष्ट्रवादीबरोबर हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वर वर दिसत असलेली राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. जगतापांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने संजोग वाघेरे यांना शहराध्यक्षपद दिले, अशी चर्चा शहरात आहे. मात्र, राष्ट्रवादीतील बंडखोर वृती थोपविण्यासाठी, सक्षम नेतृत्व म्हणून सिद्ध करण्यासाठी वाघेरे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांची एकजूट करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे.
आमदार जगतापांच्या रूपाने सक्षम असे नेतृत्व भाजपला मिळाले आहे, तसेच राज्यसभेच्या माध्यमातून ज्येष्ठ कार्यकर्ते अमर साबळे यांना संधी मिळाली आहे. सचिन पटवर्धन यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारे पद मिळाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये कमालीचा उत्साह आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमध्ये फारसा उत्साह नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोडून इतर पक्षांना आपली ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
-----------
ताकत देण्याची गरज
एकेकाळी वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसची महापालिकेतील सध्याची अवस्था गंभीर होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर येथील काँग्रेसला कोणीही वाली राहिलेला नाही. मोरे सरांनंतर सत्ता असूनही विविध मंडळे, प्राधिकरण यावरून कोणतीही मोठी पदे दिली गेली नाही. त्यामळे कार्यकर्ते नाराज आहेत. परिणामी पक्ष वाढण्याऐवजी ताकत कमी होत चालल्याचे दिसून येते. राज्य किंवा देश पातळीवरील नेत्यांनी या शहराकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गटबाजी, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. गटबाजी, हेवेदावे कमी झालेले नाहीत. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी थांबलेली नाही.