निष्ठावान कार्यकर्ते टिकविण्याचे आव्हान
By Admin | Published: January 31, 2017 04:01 AM2017-01-31T04:01:33+5:302017-01-31T04:01:33+5:30
भाजपा, शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ एकदाचे थांबले. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडीची शक्यता असल्यामुळे महापालिका निवडणूक कोणत्याही
रहाटणी : भाजपा, शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ एकदाचे थांबले. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडीची शक्यता असल्यामुळे महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा चंग बांधलेल्या अनेक इच्छुकांना आता अनेक दरवाजे खुले झाले आहेत. विविध राजकीय पक्षांमधील नाराजीचे इनकमिंग व आउटगोइंग मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे कार्यकर्ते टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सध्या सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत अनेकजण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. तसेच जमेल तसे पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकीत आहेत. एकाच जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने तिकीट देताना कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा बंडखोरीचा पक्षांना सामना करावा लागणार आहे. सध्या भाजप व शिवसेना या पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपलाच नंबर लागणार असे म्हणत अनेकांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीची शक्यता जवळजवळ संपुष्टात येत असल्याने या पक्षातील इच्छुक आनंदित झाले आहेत. पक्षात आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध भूमिका घेत आहेत. सर्वच राजकीय पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. तसा तगडा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास त्याला पक्षात घेण्यासाठी गळ टाकला जात आहे. (वार्ताहर)