सुशिक्षित पोलीस पाटलांपुढे ‘स्मार्ट’ कारभाराचे आव्हान; महिलांच्या कामगिरीबद्दल उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:42 PM2018-01-12T13:42:55+5:302018-01-12T13:52:51+5:30
समाजसेवा करण्याची एक संधी असल्याने पोलीस पाटीलपदी परीक्षा आणि मुलाखतीतून नियुक्त झालेल्यांसाठी पाटीलकी सांभाळणे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे. बहुतांश उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.
वडगाव मावळ : पोलीस पाटीलपद हे महसूल व पोलीस खात्यामधील महत्त्वाचा दुवा असून, लग्नपत्रिकेमध्ये किंवा इतर ठिकाणी शोभेसाठी वापरण्याचे पद नाही. समाजसेवा करण्याची एक संधी असल्याने पोलीस पाटीलपदी परीक्षा आणि मुलाखतीतून नियुक्त झालेल्यांसाठी पाटीलकी सांभाळणे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे. बहुतांश उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.
बहुतांश गावचे पाटील अत्यंत तरुण आणि अननुभवी आहेत, तर काही नवनिर्वाचित पाटील महिला या नुकत्याच त्या गावात विवाह करून आल्याने त्यांना काही दिवस ही जबाबदारी सांभाळणे अवघड जाणार आहे. प्रथमच परीक्षेद्वारे पाटील पदाची निवड करून गावचा कारभारी जाहीर करण्यात आला आहे. मावळ-मुळशी उपविभागीय २७१ रिक्त पदे भरण्याबाबत उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांच्या कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार मावळ तालुक्यातील १५६ रिक्त पदांकरिता तालुक्यातून ८०८ जणांनी पोलीस पाटील या पदासाठी अर्ज दाखल होते. त्यातील २५ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले होते. उर्वरित उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची गावाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित अशा पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली.
अनेक गावांतील नवनिर्वाचित पाटील हे तरुण आणि सुशिक्षित असल्याने गावातील तंटे मिटवण्यात त्यांची मोलाची भूमिका असणार आहे, तर काही गावांत तरुण अतिउत्साही पाटील गावांची डोकेदुखी ठरण्याचीही शक्यता आहे. कारण गाव तंटामुक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवायची असून, यामध्ये यांची निर्णायक भूमिका असणार आहे. अनेक गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वाद, तंटे, भांडणे परंपरागत आहेत. गटा-तटाचे राजकारण, गावातील गटबाजी, गावात असणारे हेवेदावे इत्यादी स्वरूपाच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने पाटलांना सामोरे जायचे आहे. सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन गाव तंटामुक्त करण्याचे मोठे आव्हान या नवीन पोलीस पाटलांसमोर आहे. हे आव्हान ते कसे पेलतात, हे येणारा काळ ठरवेल. गेल्या अनेक वर्षांपासून गावचे पाटीलपद उपभोगलेल्या पाटलांच्या आव्हानाला देखील या नवनिर्वाचित पाटलांना सामोरे जायचे आहे.
अतिउत्साह : शुभेच्छांच्या वर्षावात आनंदोत्सव
मावळात तर काही अतिउत्साही तरुण पाटलांनी पदाची नियुक्ती होताच आनंदोत्सव साजरा केला. पात्र उमेदवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. काही नवनिर्वाचित पाटील यांनी सत्यनारायण पूजा घातली. काही गावांत सामिष पार्ट्याही झाल्या. परीक्षा देऊन हे उमेदवार पाटील झाल्याने गावकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. परंतु हे तरुण पाटील गावच्या विकासात किती सहभाग दाखवतात, हे येणारा काळच ठरवेल.