पोलिसांसह महामार्ग अधिकाऱ्यांच्या माथी कष्टच; चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर श्रेयवाद
By नारायण बडगुजर | Published: October 6, 2022 02:59 PM2022-10-06T14:59:27+5:302022-10-06T14:59:57+5:30
अन् बावधन वाहतूक विभाग कार्यान्वित झाला......
पिंपरी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील पुणे येथील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नियोजन करण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर या हालचालींनी वेग घेतला. यात प्रामुख्याने पोलीस आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पुढाकार घेतला. पूल २ आक्टोबरला पाडण्यात आला. मात्र, त्याचे श्रेय घेण्यावरून विविध यंत्रणांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येते.
चांदणी चौक येथे वाहतूक कोंडीत अडकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाहनचालक आणि प्रवाशांनी संवाद साधत गाऱ्हाणे मांडले. कोंडी नेहमीचीच असल्याचे सांगितले. त्यामुळे उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना केली. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे तसेच पुणे येथील पोलीस अधिकारी व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासह इतर विभागातील अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पाहणी केली. उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला. पूल पाडण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत तत्काळ नियोजन केले.
पूल पाडण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा यावर खल झाले. त्यानंतर खासगी कंपनीला जबाबदारी देण्यात आली. मात्र, पुलाचे काम करण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली. त्यासाठी पोलिसांचा कस लागला. पोलिसांनीही नियोजन केले. पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी समन्वयाने वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवून वाहनचालकांना दिलासा दिला.
अन् बावधन वाहतूक विभाग कार्यान्वित झाला...
वाहतूक कोंडीत अडकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात तासभर पाहणी केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ३१ ऑगस्टला आदेश दिल्यानुसार बावधन वाहतूक विभाग कार्यान्वित झाला. त्यामुळे चांदणी चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले. पूल पाडण्यात आला त्यावेळी या विभागातील तसेच हिंजवडी, वाकड, देहूरोड, सांगवी या वाहतूक विभागातील पोलिसांनी १२ ते १४ तास वाहतूक नियमन करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
‘वर्क इन प्रोग्रेस...’
जुना पूल पाडल्यानंतरही पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने पुढील कामकाज वेगात सुरू ठेवले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी खडक फोडण्यात येत आहे. त्यासाठी स्फोट केले जात आहेत. त्यासाठी वाहतुकीचे नियोजन करणे, राडारोडा उचलणे अशी कसरत त्यांच्याकडून सुरू आहे.
पोलीस आयुक्तांच्या ‘स्टेटस’मुळे फुटली वाचा..
पूल पाडण्यात आल्यानंतर नितीन गडकरी हवाई पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रशासनाच्या विविध यंत्रणांमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. दरम्यान पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्हाटसअपला स्टेटस ठेवले. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलिसांनी चोख नियोजन केल्याबद्दल आयुक्त शिंदे यांनी ‘स्टेटस’वर कौतुक केले. त्यामुळे ‘रियल हिरों’ची कामगिरी समोर आली. तसेच श्रेय लाटण्यासाठी इतर यंत्रणांचा खटाटोप सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र, पोलीस आयुक्तांचे स्टेटस व्हायरल झाले आणि संबंधितांपर्यंत ‘योग्य’ मेसेज पोहचला.
पूल पाडण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात आला. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. विविध विभागांकडून मंजुरी घेणे, प्रस्ताव सादर करणे, भूसंपादन, तंत्रज्ञान, ठेकेदार कंपनी आणि इतर उपाययोजना या अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. तसेच पोलिसांकडूनही उत्तम नियोजन झाले. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अहोरात्र झटणाऱ्या हे अधिकारी व पोलीस कौतुकास पात्र ठरतात.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड