चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण! अखेर १० पोलिसांचे निलंबन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:51 AM2022-12-14T08:51:14+5:302022-12-14T08:51:28+5:30

शाईफेकीनंतर तडकाफडकी केले होते निलंबित

Chandrakant Patil case of spitting Finally the suspension of 10 policemen is overturned | चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण! अखेर १० पोलिसांचे निलंबन मागे

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण! अखेर १० पोलिसांचे निलंबन मागे

googlenewsNext

पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलीस दलातील १० जणांचे निलंबन करण्यात आले. या पोलिसांना निलंबनातून मुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीचे ठिकाणी कर्तव्यकरिता 'सेवेत पुनः स्थापित' करण्यात आले. बदली होण्यापूर्वी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी (दि. १३) याबाबतचे आदेश दिले. 

पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, पोलीस कर्मचारी प्रियांका गुजर यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. तसेच या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्याकरिता सेवेत पूर्ण स्थापित करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे. 

चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी चिंचवडगाव येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी मंत्री पाटील गेले होते. दरम्यान मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. या कारवाईवरून पिंपरी -चिंचवड पोलीस दल तसेच विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, राजकीय नेते व पदाधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. याबाबत काही जणांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची सूचना केली होती. 

निलंबन मागे घेण्याच्या मागणीचा रेटा वाढल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबन प्रकरणी चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले होते. दरम्यान मंगळवारी (दि. १३) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली. मात्र तत्पूर्वी आयुक्त शिंदे यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त केले.

Web Title: Chandrakant Patil case of spitting Finally the suspension of 10 policemen is overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.