शाईफेक प्रकरण भोवले? पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची आठ महिन्यांत बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:13 PM2022-12-14T14:13:56+5:302022-12-14T14:14:57+5:30
पोलिसांनीच घेतला होता अंकुश शिंदे यांचा धसका...
पिंपरी :पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने मंगळवारी (दि. १३) दिले आहेत.
तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची २० एप्रिल २०२२ रोजी बदली करण्यात येऊन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची आयुक्तपदी वर्णी लागली होती. अंकुश शिंदे यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. त्यानंतर आठ महिन्यांत शिंदे यांची नाशिक येथे आयुक्तपदी बदली करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना मुदतपूर्व बदली झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर आयुक्त शिंदे यांची बदली झाल्याने हे प्रकरण भोवले का, या प्रकरणाचे पडसाद या बदल्यांमध्ये उमटल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपद उन्नत करून विनय कुमार चौबे यांची शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा एकदा अपर पोलिस महासंचालक दर्जाचे पोलिस प्रमुख म्हणून मिळाले आहेत. पोलिस आयुक्तालय स्थापनेच्या वेळी शहराचे पोलिस आयुक्त म्हणून अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी पदभार सांभाळतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दोन आयुक्तांची नेमणूकदेखील झाली. मात्र, तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाल्यानंतर या पदामध्ये बदल करत पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलिस आयुक्त म्हणून शहरात आले. त्यावेळी कृष्ण प्रकाश यांची आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर अंकुश शिंदे हेदेखील पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले. मात्र आता विनय कुमार चौबे यांच्या रूपाने पुन्हा अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी शहराला मिळाले आहेत.
पोलिसांनीच घेतला होता अंकुश शिंदे यांचा धसका
अवैध धंदे, कर्तव्यातील कसूर किंवा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, बेसिक पोलिसिंगवर भर देणार, असे अंकुश शिंदे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली. काहींना नियंत्रण कक्षाला संलग्न केले. ‘शाईफेक’ प्रकरणानंतर १० पोलिसांचे निलंबन केले. तसेच तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संलग्न केले. त्यामुळे अंकुश शिंदे यांचा शहर दलातील पोलिसांनी धसका घेतला होता.