आकुर्डीत खंडोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल बदल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:47 AM2024-01-16T09:47:26+5:302024-01-16T09:48:05+5:30
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे...
पिंपरी :आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची मंगळवार (दि. १६) आणि बुधवार (दि. १७) रोजी यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी लाखो भाविक खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खंडोबा माळ चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल केला आहे.
यात्रेनिमित्त वाहतुकीत केलेला हा बदल मंगळवारी आणि बुधवारी पहाटे पाच ते रात्री दहा वाजतापर्यंत असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
वाहतुकीत केलेला बदल :
- थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकातून मोहननगर चिंचवडमार्गे इच्छित स्थळी जातील.
- परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शनवरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
- चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने टिळक चौक / शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.
- टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने सरळ चिंचवड स्टेशन/ दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.