मेट्रोचा मार्ग बदलावा, बाणेरमधील लोकांना होईल फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:15 AM2018-01-23T06:15:34+5:302018-01-23T06:15:44+5:30
रस्तारुंदीकरणाला नागरिकांचा वाढता विरोध होत असल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर येथून जाणा-या प्रस्तावित मेट्रोचा बाणेर बालेवाडीमधून जाणारा मार्ग बदलण्यात यावा
बाणेर : रस्तारुंदीकरणाला नागरिकांचा वाढता विरोध होत असल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर येथून जाणा-या प्रस्तावित मेट्रोचा बाणेर बालेवाडीमधून जाणारा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.
सध्या मेट्रोचा मार्ग बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिरमार्गे दसरा चौक असा आखण्यात आला आहे. हा मार्ग विकास आराखड्यानुसार २४ मीटरचा आहे. मेट्रोसाठी हा मार्ग ६ मीटरने वाढवावा लागणार आहे. यामुळे दोनच वर्षांत या मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांना पुन्हा जागा द्याव्या लागणार आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांनी बांधलेली घरे तोडावी लागणार आहेत. यामुळे नागरिकांनी या मार्गाला विरोध दर्शवला आहे.
ज्योती कळमकर म्हणाल्या, मेट्रोचा मार्ग ३0 मीटर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून घेतल्यास अधिक नागरिकांना त्याचा फायदा होईल. तसेच हायास्ट्रीटवरून मेट्रो गेल्यास अनेक लोक बेघर होण्यापासून वाचतील. तसेच नागरिकांचा विरोधही होणार नाही. यासाठी २६ डिसेंबर, २0१७ रोजी लेखी पत्रव्यवहारदेखील केला आहे.
मेट्रोचा मार्ग बालेवाडी फाटा चाकणकर मळा परिसरातून घेण्याऐवजी हा मार्ग हायस्ट्रीट परिसरातून आखण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी केली आहे.
नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, हायस्ट्रीट परिसरातून मेट्रो मार्ग आखल्यास मेट्रो वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच बाणेर बालेवाडीमधील अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच अनेक नागरिक बेघर होणार नाहीत. यामुळे हायस्ट्रीट नागरिकांचा विरोध होणार नाही. यामुळे हा मार्ग घेण्यात यावा.
बाणेरमधील लोकांना होईल फायदा -
गणराज मंगल कार्यालयापासून हायस्ट्रीट परिसरात 30 मीटर रस्त्याची उपलब्धता आहे. तसेच बाणेर परिसरातील बहुतांश नागरिकांना या मेट्रोचा फायदा घेता येईल.
बालेवाडी येथील दसरा चौकामध्येदेखील नागरिकांना मेट्रोचा फायदा होईल. याचा विचार करून या मार्गाच्या लेखी सूचना नगरसेवकांनी पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.
मेट्रो मार्ग हायस्ट्रीट परिसरातून घेतल्यास बाणेरमधील धनकुडेवस्ती, डोंगराजवळील सोसायट्या यांनादेखील मेट्रोचा फायदा होईल. यामुळे सध्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गामध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.