कारभारी बदलले, तरी कारभार अनागोंदीच!

By Admin | Published: June 26, 2017 03:50 AM2017-06-26T03:50:19+5:302017-06-26T03:50:19+5:30

महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन कारभारी बदलले. ‘पारदर्शक’ कामकाजाचे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. पिंपरी-चिंचवडकरांनी कारभारी बदलले; मात्र अनागोंदी कारभार तसाच आहे.

Changed the steward, though the lawlessness! | कारभारी बदलले, तरी कारभार अनागोंदीच!

कारभारी बदलले, तरी कारभार अनागोंदीच!

googlenewsNext

महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन कारभारी बदलले. ‘पारदर्शक’ कामकाजाचे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. पिंपरी-चिंचवडकरांनी कारभारी बदलले; मात्र अनागोंदी कारभार तसाच आहे.
आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्यांचे पिंपरी-चिंचवडकरांनी जल्लोषात स्वागत केले. परंतु, गतवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेतर्फे दिंडेकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूतील गैरकारभाराचा मुद्दा गाजला. ताडपत्री खरेदीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच महापौरांच्या नादुरूस्त वाहनाच्या मुद्द्याने नवा वाद सुरू झाला. त्यानंतर नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना गणवेश सक्तीवरून महापौर, भाजपा पक्षनेते आणि स्थायी समिती अध्यक्षा यांच्यात ताळमेळ नसल्याचे उघड झाले. अशी एकेक अनागोंदीची प्रकरणे उजेडात येऊ लागली आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी ‘भ्रष्टाचार व भयमुक्त’ शहर करण्याच्या वल्गना करणऱ्या भाजपाच्या कारभाऱ्यांनी जुन्या कारभाऱ्यांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. गतवर्षी आषाढी वारीवेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारकऱ्यांना विठ्ठल-रूक्मिणी मूर्तीं भेट स्वरूपात दिली. या मूर्ती खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला होता. त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
महापालिकेत सत्ताबदल झाला, कारभारी बदलले. सत्तेत आल्यानंतर याच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आषाढी वारीसाठी वारकऱ्यांकरिता बाजारभावापेक्षा जादा दराने ताडपत्री खरेदी केली. त्यामुळे सुमारे सहा लाख साठ हजारांचा भुर्दंड महापालिकेला बसणार असून, प्रामाणिक करदात्यांच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला. कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी पठाणी वसुलीची टीका झाली. आतापर्यंत केवळ आरोप करण्याची सवय असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांची आरोप सहन करताना
तडफड होऊ लागली आहे. त्यामुळे या
प्रकरणाची तटस्थपणे चौकशी करण्याऐवजी प्रशासनाला हाताशी धरून चौकशी टाळण्याकडे कल दिसतो.
महापालिकेने दिलेली मोटार वारंवार रस्त्यात बंद पडते, अशी तक्रार खुद्द महापौरांनाच करावी लागते. यावरून पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले. नवीन मोटार द्यावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी महापौरांच्या बंद मोटारीची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकविल्याची चर्चा झाली. अशा प्रकारे आपल्या समस्येचे जाहीर प्रदर्शन करण्याच्या कृतीवरून भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. पूर्वी जशी ‘गटबाजी’वरून राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत असे, आता तीच परिस्थिती शहर भाजपामध्ये दिसते.
भाजपात आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे गट सर्वश्रुत आहेत. दोन दिवसांपूर्वी भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांची लांडगे यांनी स्वतंत्र बैठक घेतली. केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर उद्घाटनावेळी पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आली. लांडगेसमर्थक महापौर नितीन काळजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, त्या वेळी जगतापसमर्थक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. एवढेच नाही, तर महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनीही उद्घाटनाला दांडी मारली.
एकाच कुटुंबात अनेक कारभारी झाल्यानंतर गोंधळ उडतो, तसा कारभार भाजपात सुरू आहे. त्यामुळे शिस्तप्रिय भाजपातील जुने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. शिवाय महापालिकेच्या कारभारात अधिकृत भूमिका नसतानाही काही पदाधिकारी अनधिकृतपणे घुसून दिशाभूल करीत आहेत.
त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असून, पदाधिकाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसाठी गणवेश खरेदीचा ठराव स्थायी समिती सभेपुढे आला. तो ‘स्थायी’पुढे कोणी आणला, याबद्दल महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी अनभिज्ञ होते. त्यामुळे पूर्वीच्या अनागोंदी कारभारात सुधारणा अपेक्षित असताना तो आणखी ढिसाळ होताना जनतेला पाहावा लागत आहे.

Web Title: Changed the steward, though the lawlessness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.