एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:12 AM2023-12-11T11:12:45+5:302023-12-11T11:13:05+5:30
दुर्घटनेच्या दिवशी शटर जवळच काम करता असल्याने आग लागल्यानंतर लगेच बाहेर पडता आले
पिंपरी : ‘‘दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग लागल्यानंतर लगेच बाहेर पडता आले. त्या दिवशी शटर जवळच काम करीत असल्यामुळे जीव वाचला,’ रेणुका ताथोड पती मारुती ताथोड यांना सांगत होत्या.
रेणुका यांचे मूळ गाव तळेगाव पातुर्डा, जिल्हा अकोला. मागील वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालेले. पती पेंटरचे काम करतात. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी तळवडेच्या कंपनीत कामाला जाऊ लागल्या. घरी पती मारुती ताथोड, सासू हिराबाई ताथोड, आजेसासरे प्रल्हाद ताथोड असा परिवार. शुक्रवारी रेणुका यांची तब्येत ठीक नव्हती. तरीही त्यांनी पती मारुती ताथोड यांच्याजवळ कामावर जायचा हट्ट केला. नेहमीप्रमाणे रेणुका कामावर गेल्या.
‘‘दुपारी मी कामावर असताना घरून फोन आला. रेणुकाच्या कंपनीत आग लागल्याचे कळताच कंपनीकडे धाव घेतली. कंपनीजवळ गेल्यावर ती भाजली असल्याचे कळाले. पायाखालची जमीनच सरकली’’, पती मारुती सांगत होते. ‘‘कंपनीत रेणुका दररोज कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायची. हे काम आतील बाजूला सुरू असते. पण, शुक्रवारी कँडलला टोपण लावायचे काम दिले. हे काम गेटजवळ असते. त्या दिवशी काम बदलले म्हणून तिचा जीव वाचला,’’ अशी भावना पती मारुती ताथोड यांनी व्यक्त केली.