वातावरणात बदल; पिंपरी चिंचवडला सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
By प्रकाश गायकर | Published: November 27, 2023 03:58 PM2023-11-27T15:58:03+5:302023-11-27T15:59:02+5:30
वातावरणामध्ये बदल झाल्यास शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले
पिंपरी : शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामध्येच रविवारी शहरात पावसाने हजेरी लावली. वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे शहरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावू लागल्या आहेत. रुग्णांमध्ये सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असून शहरातील मनपा रुग्णालयासह खासगी रुग्णालये भरली आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला शहरामध्ये थंडीची चाहूल लागली. त्यानंतर महिन्याच्या शेवटी पुन्हा थंडी गायब झाली आहे. शहरामध्ये ढगाळ वातावरण असून त्याचा परिणाम नागरिकांवर झाला आहे. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा अधिक समावेश आहे. नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशा व्याधींनी ग्रासले आहे. तसेच अचानक झालेल्या वातवरणातील बदलांने लहान मुलांमध्येही आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे. लहान मुलांना जुलाब, उलट्या, सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आहे. त्यामुळे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी ओपीडीमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. वातावरणात झालेला बदल मानवी शरिराला अनुकूल होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊन द्यावा लागतो. वातावरणामध्ये बदल झाल्यास शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही घ्या काळजी
पाणी जास्त प्रमाणात प्या, सकस आहार घ्या. तसेच आहारामध्ये कडधान्ये फळे व भाजीपाल्यांचा समावेश करा. लिंबूपाणी व नारळपाण्याचे सेवन करा, त्यामुळे शरीरातील पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होते.
वातावरणामध्ये झालेल्या बदलाने शहरात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या रुग्णांनी महापालिकेच्या दवाखान्यामध्ये जाऊन तात्काळ तपासणी करून घ्यावी. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोळ्या-औषधांचा पुरेसा साठा आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.