पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 04:42 PM2020-11-02T16:42:25+5:302020-11-02T23:52:09+5:30
भाजपकडून तुषार हिंगे यांच्यानंतर उपमहापौर पदासाठी कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.
पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर हे पद गेले काही दिवस रिक्त होते. परंतु आता या पदासाठी भाजपकडून केशव घोळवे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सोमवारी ( दि.2) घोळवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
पिंपरी महानगरपालिकेच्या उपमहापौरपद उमेदवारीसाठी दोन दिवस खलबते सुरू होती. अखेरीस सत्ताधारी भाजपच्या वतीने केशव घोळवे यांचा अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी पंकजा मुंडे गटाची सरशी झाल्याने शहरातील स्थानिक नेतृत्व करणाऱ्या नेत्याना चपराक दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मागील पंधरवढ्यात उपमहापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौर निवडीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये भाजपच्या वतीने एक एकमेव अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. महापालिकेत भाजपची एकमुखी सत्ता असल्याने उपमहापौरपदी घोळवे यांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
.......
मागील आठवड्यापासून उपमहापौरपदासाठी कोणाला संधी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. स्थायी समिती, विषय समित्या, महापौर आदी पदांमध्ये पिंपरी विधानसभेला दुजाभाव मिळाल्याची तक्रार पक्षातील कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडे केली होती. उपमहापौरपदासाठी पिंपरीला स्थान मिळावे, तसेच भाजपचे निष्ठावान नगरसेवक केशव घोळवे यांना संधी मिळावी, यासाठी लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अशा जुन्या गटाच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे साकडे घालण्यात आले होते. त्यानुसार मुंडे यांनी घोळवे यांना उमेदवारी द्यावी, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिले होते. तर घोळवे यांचा पत्ता कट करण्यासाठी भाजपातील एक जुन्या गटाच्या वतीने मोर्चेबांधणी केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मुंडे गटाने जोर लावल्याने उपमहापौरपदी घोळवे यांना संधी मिळाली.
..........
भोसरी विधानसभा गटाच्या वतीने मोशीतील नगरसेवक वसंत बोराडे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, त्यास चिंचवड च्या गटाची मूक संमती होती, पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी घोळवे यांचे नाव शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांना कळवले. त्यानंतर आज घोळवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.
.........
प्राधिकरण अध्यक्षपद मुंडे गटास मिळावे, यासाठी यापूर्वी पंकजा मुंडे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले होते. त्यानंतर उपमहापौर निवडीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडे गटाची उपमहापौरपदासाठी सरशी झाली आहे. यातून मुंडे गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.