वयोवृद्ध नवरोबाला घातला १८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:36 PM2017-10-07T16:36:36+5:302017-10-07T16:39:37+5:30
जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रोफाईल अपलोड केलेल्या एका ६५ वर्षाच्या ‘नवरोबा’ला महिलेने साडेअठरा लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रोफाईल अपलोड केलेल्या एका ६५ वर्षाच्या ‘नवरोबा’ला महिलेने साडेअठरा लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी महिलेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पारूदास खंदारे (वय ६५, रा. थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फ्रान्सिस मर्सी यासह महिलेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दुसरे लग्न करायचे होते. यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर प्रोफाईल अपलोड केले होते. हे प्रोफाईल पाहून आरोपी आणि त्याच्या साथीदार महिलेने मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. ‘तुमची प्रोफाईल मला आवडलेली आहे. तसेच माझ्या वडिलांनी मागे सोडलेली संपत्ती मी लवकरच भारतात पाठविणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे भरावे लागणार आहेत. तुम्ही पैसे बँकेत भरा असे तिने फिर्यादीला सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने २५ आॅगस्ट ते ४ आॅक्टोबर दरम्यान १८ लाख ५० हजार रूपये भरले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संगीता गाडे पुढील तपास करीत आहेत.