केअर टेकरकडून फसवणूक, तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:10 AM2018-04-09T01:10:01+5:302018-04-09T01:10:01+5:30
केअर टेकर म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीनेच वाकड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पिंपरी : केअर टेकर म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीनेच वाकड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापू नामदेव वाकडकर (वय ६५, रा. वाकड, पुणे) असे आर्थिक फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी सूरज प्रकाश बोरोले (वय ३५), किरण नितेश सिंग, नितेशकुमार सिंग (तिघेही रा. सेलिना पार्क, हडपसर, पुणे) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू वाकडकर यांनी वाकड येथे असलेली वडिलोपार्जित जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकली. त्याचे पैसे त्यांनी एचडीएफसी बँकेत ठेवले. बँकेने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या खात्यावरील व्यवहार पाहण्यासाठी सूरज याची नेमणूक केली. सुरुवातीला सूरजने प्रामाणिकपणा दाखविला. काही कालावधीनंतर बँकेतील काही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविण्याचा सल्ला त्याने वाकडकर यांना दिला. वाकडकर यांनी त्यास संमती दिली. तसेच काही रक्कम अॅक्सिस बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविण्यास वाकडकर यांना सांगितले. त्या बँकेचे चेकबुक सूरजने स्वत:कडे ठेवले. चेकबुकवर आणि कोºया कागदावर वाकडकर आणि त्यांची पत्नी, मुलगा आणि सुनेच्या सह्या घेतल्या. वाकडकर यांच्या खात्यावरून वेळोवेळी तब्बल १ कोटी १२ लाख रुपये काढून त्याने स्वत:च्या खात्यावर जमा केले.
वाकडकर यांच्या सुनेला मुलांच्या भवितव्यासाठी बँकेत स्वतंत्र गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, असे सांगून सूरज बोरोले याने त्यांच्याकडून दरमहा २५ हजार रुपये याप्रमाणे ३१ महिने रक्कम घेतली. तीसुद्धा त्याने स्वत:च्या खात्यावर जमा केली. दरम्यानच्या काळात एचडीएफसी बँकेने सूरजला नोकरीवरून काढून टाकले. त्यास नोकरीवरून कमी केल्याची माहिती सूरजने वाकडकर यांना दिली नाही. तो त्यांच्या संपर्कात राहिला. वेळोवेळी थोडीफार रक्कम देऊन वाकडकर यांना त्यांची रक्कम सुरक्षित असल्याचे भासवीत राहिला. एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा झाला नसल्याचे वाकडकर यांच्या लक्षात आले. बँकेत चौकशी केली असता, सूरजला बँकेने काही महिन्यांपूर्वीच कामावरून कमी केल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे वाकडकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सूरज आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.