पंतप्रधान आवास योजनेच्या आमिषाने फसवणूक; पिंपरीत ‘आॅटोक्लस्टर’मध्ये 'राडा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:03 PM2018-01-20T13:03:34+5:302018-01-20T13:41:21+5:30
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्तात घरकुल देण्याची योजना आहे. असे सांगून हजारो नागरिकांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले. तेथे गेल्यानंतर अर्जासाठी एक हजार शुल्काची सक्ती केली. संतप्त नागरिकांनी प्रदर्शनस्थळी गोंधळ घातला.
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्तात घरकुल देण्याची योजना आहे. असे सांगून हजारो नागरिकांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले. आॅटोक्लस्टरमध्ये प्रदर्शनासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर अर्जासाठी एक हजार शुल्काची सक्ती केली. संतप्त नागरिकांनी प्रदर्शनस्थळी गोंधळ घातला. खुर्च्या, टेबलांची तोडफोड केली. पोलिसांनी धाव घेऊन तणावाची परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांनी विविध ठिकाणी अर्ज भरले. शासनाच्या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात हककाचे घर मिळेल, या अपेक्षेने हजारो नागरिकांनी अर्ज भरून घेणाऱ्यांना प्रतिसाद दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २.६७ लाख सबसिडी मिळणार, असेही सांगण्यात आले होते. साडेआठ लाखाचे घर सहा लाखात मिळू शकेल. या आशेने नागरिकांनी अर्ज सादर केले. घरकुल योजनेसाठी अर्ज सादर केलेल्यांची माहिती संकलित करून खासगी वित्त संस्थेने बांधकाम व्यवसायिकांना हाताशी धरून गृहप्रकल्पाचे प्रदर्शन आयोजित केले. सुरूवातीला ७ जानेवारीला हे प्रदर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी शेकडो अर्जदार आॅटोक्लस्टरजवळ येऊन गेले. त्यांना प्रदर्शन पुढे ढकलले आहे, लवकरच एसएमएसव्दारे पुढची तारिख कळविली जाईल. असे सांगितले. २० आणि २१ जानेवारी ही प्रदर्शनाची तारिख कळविल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी गर्दी केली.
आॅटोक्लस्टर येथे प्रदर्शनस्थळी नागरिकांना सोडण्यात आले. प्रवेश करताच, त्यांना एक हजार रुपये शुल्क भरण्याची सक्ती केली. तसेच त्यांना परवडेल अशा स्वरूपाच्या गृहप्रकल्पाची माहिती दिली जात नव्हती. खासगी बांधकाम व्यवसायिकांचे मोठे प्रकल्प त्यातील ४० ते ५० लाखांच्या सदनिका याबद्दल माहिती दिली जात होती. सामान्य नागरिक एवढ्या मोठ्या रकमेच्या सदनिका खरेदी करू शकणार नाहीत. शासकीय योजनेचा लाभ मिळणार म्हणून या प्रदर्शनास आलो. मात्र या ठिकाणी फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी संयोजकांकडे तक्रार केली. मात्र कोणीही त्यांची समजूत काढण्यास तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रदर्शनस्थळी खुर्च्या, टेबल यांची तोडफोड केली. दालने तोडून टाकली. काचा फोडल्या. हाताला येईल ती वस्तू नेण्याचा प्रयत्न केला. याबातची माहिती मिळताच परिमंडल तीनचे सहायक पोलीस आयु्कत सतिश पाटील, तसेच पोलीस निरिक्षक (गुन्हे) मसाजी काळे व अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पागंगवली. गोंधळ होताच, आयोजकांनी तेथून पळ काढला होता.
आॅटो क्लस्टरच्या आवारात हजारो लोकांची गर्दी झाली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी प्रदर्शन सुरू होताच, गोंधळ झाल्याने प्रदर्शनस्थळी खुर्च्या, टेबल आणि अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दृश्य पहावयास मिळाले.