महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अठरा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 07:59 PM2019-09-01T19:59:57+5:302019-09-01T20:02:12+5:30
पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत घडला. या प्रकरणी नितीन रंगनाथ श्रीरामे (वय २९, रा. पिंपळे निलख) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हेमंत शहाजीराव देशमुख (वय ४०, रा. जुनी सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत याने फिर्यादी नितीन आणि त्यांच्या दोन मित्रांना पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महापालिका येथे सहाय्यक अभियंता, शिपाई व लिपिक या पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या अमिषापोटी आरोपी हेमंत याने तिघांकडून फुगेवाडी येथील मेगामार्ट येथे रोख रक्कम तसेच ऑनलाइन माध्यमातून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. तसेच त्यांना बनावट सही व शिक्क्याचे नियुक्तीपत्र दिले. यातून फिर्यादी नितीन आणि त्यांच्या मित्रांना नोकरी मिळाली नाही. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.