जमीन विक्री करण्याचे सांगून महिला वकिलाची ६५ लाखांना फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:16 PM2019-06-16T16:16:16+5:302019-06-16T16:18:05+5:30
जमीन विक्री करतो, असे सांगून बनावट दस्त तयार करून महिला वकिलाची ६५ लाखांची फसवणूक केली.
पिंपरी : जमीन विक्री करतो, असे सांगून बनावट दस्त तयार करून महिला वकिलाची ६५ लाखांची फसवणूक केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज सुरेश लांडगे (रा. आळंदी रोड, भोसरी) व नीलेश सुरेश कुदळे (रा. मोशी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पद्मीनी राजे मोहिते (वय ४९, रा. फुगेवाडी, सध्या रा. आखरा बट्टा, श्रिोही, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहेत. पद्मीनी राजे वकील आहेत. फिर्यादी पद्मीनीराजे मोहिते यांची मोशी येथे १० गुंठे जमीन आहे. ती जमीन विक्री करतो असे आरोपी धीरज लांडगे याने फिर्यादी मोहिते यांना सांगितले. आरोपी नीलेश कुदळे याला जमीन विक्री करतो, असे सांगून दस्त बनविला. फिर्यादी मोहिते यांना दाखविलेला दस्ताचा नमुना व त्यांनी नोंदणी करताना वापरलेला दस्त बनावट तयार केला. तसेच नीलेश कुदळे याच्या बँक खात्यावरील धनादेश दिले. २५ लाख, २० लाख आणि २० लाख असे एकूण ६५ लाखांचे तीन धनादेश फिर्यादी मोहिते यांना दिले. मात्र तीनही धनादेश वटले नाहीत. तीनही धनादेश ‘बाऊन्स’ झाल्याने फिर्यादी मोहिते यांना ६५ लाख रुपये मिळाले नाहीत. यातून आर्थिक फसवणूक करून आरोपींनी फिर्यादी मोहिते यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.