वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:49 PM2022-02-25T16:49:29+5:302022-02-25T16:49:41+5:30
पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृत पणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरात छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. कारवाई बुधवारी (दि. २३) ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली. कारवाईत अभिनेत्री आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय ४८, रा. वाघोली. मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), हेमंत प्रणाबंधू साहू (वय ३२ रा. पुणे-नगर रोड, वाघोली. मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपुर, पंगातीरा डिंगालाल परांगजाल उडीसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून मोबाईलवरून व्हाट्स अप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारून कारवाई केली.
सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. सुटका केलेल्या मुलींच्या माध्यमातून आरोपी जितेंद्र आणि हेमंत यांना वेश्या व्यवसायाचे पैसे नेण्याच्या बहाण्याने बोलावून पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडून १० हजार रुपये रोख रक्कम, ९ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि १०० रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुमित डमाळ, अतुल लोखंडे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.