Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल; सांगवीत पुरग्रस्तांनी शिंदेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:16 PM2024-08-05T14:16:43+5:302024-08-05T14:17:56+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे
पुणे : पुणे पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होतीये. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. परंतु या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुण्यातील या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पुरग्रस्तांशी चर्चा कारण्यासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड मधील सांगवी भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेत पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
पिंपरीत अतिवृष्टीमुळे पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे.
असा असणार दौरा
आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले आहे. आता ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी आणि पुरग्रस्तांशी चर्चा करण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पीएमसी कॉलनी वाकडेवाडी या भागात भेट देणार आहेत. सिंहगड रोड भागात मागील आठवड्यात पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील एकता नगरी येथे नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुणे विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.