मुख्यमंत्री साहेब, सांगा नाटक करायचे की नाही; नाट्य संमेलन होतंय खरं पण...,
By विश्वास मोरे | Published: January 4, 2024 06:01 PM2024-01-04T18:01:46+5:302024-01-04T18:01:58+5:30
पिंपरीत नाटक नाट्य संमेलन होतंय खरं, पण नाटकांचा गळा घोटताहेत त्याचे काय? नाट्य कलावंतांचा प्रश्न
पिंपरी : सांस्कृतिक उप राजधानी बनू लागलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापलिकेच्या वतीने ललित कलांचा गळा घोटला जात आहे. श्रीमंत महापालिकेच्या विरुद्ध मिरविणाऱ्या महापालिकेला नाट्य परंपरा मोडीत काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याची परिणीती नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग सादर करणे बंद केले आहे. कारण भरमसाठ भाडेवाढ! नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी नऊ हजाराचा खर्च आता ३८ हजारावर पोहोचला आहे. या शहरात नाट्य संमेलन होतंय खरं, पण, नाटकांचा गळा घोटताहेत त्याचे काय? "मुख्यमंत्री साहेब, सांगा नाटक करायचे की नाही, असा प्रश्न नाट्य कलावंत करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यात प्रशासनाची मनमानी सुरु आहे. तर या शहराचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी तोंडावर पट्टी बांधली आहे. त्यांना कोणी जुमानत नसल्याचे चित्र आहे. सांस्कृतिकनगरीपुणे शहराच्या लगतच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सरेआम कलांचा गळा घोटला जात आहे आणि लोकप्रतिनिधी मूगगिळून बसले आहेत.
नाट्यगृह भाडेवाढ
पिंपरी चिंचवडचे शिल्पकार प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहराची गरज ओळखून शहरात चिंचवड येथे पहिले नाट्यगृह उभारले. त्यानंतर तीस वर्षात पाच नाट्यगृह निर्माण झाली आहे. त्यामध्ये चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, प्राधिकरणात गदिमा नाट्यगृह, भोसरी येथे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरी येथे आचार्य मंदिर, पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह यांचा समावेश आहे. चिंचवड येथील नाट्यगृहात सर्वाधिक नाट्य प्रयोग होतात. दरवाढीचा फटका नाट्य कलावंत, नाट्य संस्थांना बसला आहे.
नवं वर्षात नाटक केली बंद
महापालिकेचा हेकेखोरपणा कलावंताच्या मुळावर आला आहे आणि त्यातच दरवाढीमुळे एकही नाटक सादर न करण्याची भूमिका नाट्य संस्थानी घेतली आहे. त्यामुळे शहरात एकही नाटक होणार नाही. नाट्यसंथांच्या आंदोलनात सर्व व्यावसायिक नाट्यसंस्था, हौशी नाट्यसंस्था, संगीत रंगभूमी, गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या संस्था, अरंगेत्रम, नाट्य परिषद विविध प्रतिष्ठाने यांनीही सहभाग नोंदविला आहे. मात्र, या आंदोलनाचे महापालिका प्रशासनास देणे घेणे नाही. आता नाट्य कलावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात कैफियत मांडणार आहेत.
दुपटीनी घटली नाटके
गेल्या सहा महिन्यापासुन नाट्यगृह दरवाढ प्रश्न गाजत आहे. काही महिन्यापूर्वी थोडीशी दरवाढ मागे घेतली. मात्र, त्यांतरही विद्यमान दरवाढ अन्यायकारक असल्याचे नाट्यसंस्थांचे मत आहे. वास्तविक दरवाढ होण्यापूर्वी महिन्याला १५ ते २० नाट्य प्रयोग होत असत. मात्र, गेल्या तीन महिण्यात हे प्रमाण निम्याने घटले आहे. आता तर वर्षांरंभापासून नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद आहे. मात्र, याचे महापालिकेस काहीही देणे घेणे नाही.
संस्था एकवटल्या!
नाटकाला नऊ हजाराऐवजी आता ३८ हजार खर्च होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत ही दरवाढ चारपट आहे. चारपट वाढ कशासाठी? असा प्रश्न नाट्यकर्मी विचारत आहे तर जानेवारीपासून प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम करणार नाही, असा निर्णय सर्व व्यावसायिक नाट्यसंस्था, हौशी नाट्यसंस्था, गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या संस्था, अरंगेत्रम, नाट्य परिषद , चिंचवड शाखा आदी सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्था यांनी घेतला आहे.
काय आहेत मागण्या
१) नाटक सादरीकरण करण्यासाठी प्रेक्षागृहाचे भाडे, विज बिल, खुर्च्या, स्पॉटलाईट, कलाकारांसाठी असणारी व्हीआयपी रूम अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून शुल्क वसूल केले जाते. पूर्वी नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी आठ हजार रुपये भाडे आणि इतर लाईट बिल आणि इतर खर्च एक हजार असे एकूण नऊ हजार रुपये आकारले जात होते.
२) आता नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी १४१७६ रुपये भाडे तसेच साऊंड सिस्टिमसाठी २३०० रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये मिक्सर, प्रोसेसर, यांचा खर्च धरला आहे. स्पॉट लाईटसाठी दोन हजार रुपये खर्च आणि लाईट बिल अर्थात विद्युतसाठी दहा हजार रुपये बिल आकारले जात आहे. नाटक सादर करण्यासाठी ३८ हजार ४६० रुपये शुल्क आकारले जात आहे.
३) सामाजिक संस्थांना व्याख्यान, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण यासाठी व्यावसायिक दराने भाडे आकारले जात आहे. ते कमी करावे.
४) कमीत कमी दोन ते तीन तासांचे भाडे आकारले जावे. सध्या पाच तासांचे भाडे आकारले जात आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी भाडे न परवडणारे आहे.
प्रशासकीय राजवटीमध्ये नाट्यगृहांची केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. दरवाढ मागे घेणे गरजेचे आहे. तरच, नाट्यचळवळ टिकेल. प्रयोग करणे परवडणार नसेल तर आम्ही तोटा सहन करून नाटक कसे सादर करायचे. आम्ही आमची भूमिका महापालिकेस कळवली आहे. नाट्य प्रयोग बंद केले मात्र, प्रशासनास काहीही फरक पडत नाही, हे दुर्दैव आहे. दरवाढ मागे घ्यावी. प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. - रंगकर्मी, निर्माते.