गैरव्यवहाराची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:10 AM2018-01-24T06:10:41+5:302018-01-24T06:10:55+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
महापालिकेतील राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची १५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज केली. ‘भय व भ्रष्टाचारमुक्तीचा’ असा नारा देऊन निवडणूक लढलेल्या भाजपाच्या पदाधिकाºयांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत लूट सुरू आहे. सत्ता आल्यापासून पदाधिकारी, आमदार, खासदार, तसेच जुने-नवे कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरूच आहे. ठेकेदारांची बिले देताना तीन टक्के रक्कम दिल्याशिवाय बिले मिळणार नाहीत, अशी अडवणूक केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गेली होती. या तक्रारीने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपाच्या सल्लागार नियुक्तीच्या विषयाला जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर स्थायी समिती सभेत एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यात विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून रिंग करण्यात आली. ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी हडप केला. महापालिकेचे १०० कोटींचे नुकसान केले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. हा मुद्दा ऐरणीवर येताच, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, प्रशांत शितोळे यांनीही भाजपाचे रिंग प्रकरण चव्हाट्यावर आणले. खासदार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आरोप केला होता.
असे आहे खासदारांचे पत्र
ना खाऊंगा ना खाणे दुँगा, असे पंतप्रधानांचे धोरण आहे. मुख्यमंत्री म्हणून आपलीही स्वच्छ व पारदर्शक कारभाराची प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा देण्याचे काम महापालिकेतील पदाधिकारी करीत आहेत. स्थायी समितीच्या ४२५ कोटीच्या निविदा प्रक्रियेत रिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे पक्षावर होणाºया आरोपांची दखल घ्यावी, असे पत्र खासदार साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्त हर्डीकर यांना चौकशी करून अहवाल पाठवावा, असा आदेश दिला.
लवकरच अहवाल पाठविणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र आले असल्याच्या वृत्तास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दुजोरा दिला. खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्या पत्राचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. रस्ते विकासाच्या ४२५ कोटींच्या रिंग प्रकरणाबाबत चौकशी करून राज्य शासनाला अहवाल पाठवावा, असे आदेशात म्हटले असून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.