चिखली मोशी हाऊसिंग गृहनिर्माण सोसायट्यांनी वाचला समस्यांचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 07:52 PM2019-07-23T19:52:24+5:302019-07-23T19:53:11+5:30
चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोग्य, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. त्यानंतर ‘प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.
पिंपरी: चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोग्य, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. त्यानंतर ‘प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.
महापालिकेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी परिसंवाद झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता मकरंद निकम, राजन पाटील, राजेंद्र राणे, संजय घुबे, राजेर पवार, संजय कुलकर्णी, श्रीकांत सावने, फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, सचिव संजीवन सांगळे आदी उपस्थित होते.
फेडरेशनच्या वतीने, विविध सोसायट्यांच्या वतीने अनेक समस्या मांडल्या. आपण ज्या ठिकाणी राहतो, तो परिसर आणि समाज स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित असायला हवा, एवढीच माफक अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे,आमदार लांडगे यांनी सांगितले. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना तोडगा काढण्याचे निर्देश दिले. परिसरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी एक महिन्यात उपाययोजना करावी. च-होली, मोशी, चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरु आहेत. काही रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. ती येत्या पंधरा दिवसात करून घ्यावी. पुरेशी पार्किंग नसल्याची विविध सोसायट्यांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना योग्य ते आदेश देऊन प्रसंगी त्यांच्या परवानग्या नाकारून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी दिले.
आयुक्त म्हणाले, ‘‘शहराला स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी सर्वांची साथ महत्वाची आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उत्तम रस्ते, फूटपाथ, दवाखाने, शाळा, बगीचे निर्माण केले जाणार आहेत. स्मार्ट सिटीत कचरा देखील स्मार्ट पद्धतीने गोळा केला जाणार आहे. हिंजवडीसाठी मोशी काळेवाडी फाटामार्गे इलेक्ट्रिक एसी बस लवकरच सुरु होणार आहे. महापालिकेने एक हजार बसची मागणी केली असून काही बस मिळाल्या आहेत. आधुनिक पद्धतीने एसटीपी प्लांट सुरु केले जातील. ज्यामुळे ते सोसायटीच्या जवळ नकोसे वाटणार नाहीत. प्रदूषण, आगीच्या घटना, कचरा, भंगार व्यवसाय यावर तोडगा काढण्यात येत आहे.’’