चिखलीत टोळक्याचा धुडगूस, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:57 AM2018-11-11T01:57:30+5:302018-11-11T01:57:49+5:30
दोघांना मारहाण : किरकोळ कारणावरुन तीन वाहनांची तोडफोड
पिंपरी : दहशत माजविण्याच्या उद्देशाने आलेल्या पंधरा जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करत तीन वाहनांची तोडफोड केली. चिखलीतील मोरेवस्ती येथे बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
नितीन बबन कारले (वय ३८, रा. स्वामी विवेकानंद हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माने, किरण राठोड, अनिल कांबळे, गणेश तोरसकर, जितेंद्र जैसवाल, सागर जैसवाल, गणेश थोरात, अमोल राठोड, सुनील राठोड, अनिल भोसले, विशाल राठोड, प्रतीक बोरसे, समाधान मासाळ, कैलास डोंगरे ऊर्फ मोन्या ऊर्फ एम. के़ शिवा (पूर्ण नाव माहिती नाही), गणेश थोरात, मयूर चव्हाण, गणेश गायकवाड, तुषार भंडारी यांच्यासह त्यांच्या पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कारले यांनी त्यांची कार नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केली होती. दरम्यान रात्री अचानक पंधरा ते वीस जणांचे टोळके हातात दांडकी, लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या कॉलनीत घुसले. कारले रस्त्यावर उभे असताना आरोपी जितेंद्र जैसवाल याने कारले याना आम्हाला बघून तू मुद्दाम इथे का थांबला, तुला जास्त मस्ती आली काय, आता तुला दाखवतो, असे म्हणून त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये असलेले पाकीट जबरदस्ती काढून घेतले. तसेच कारले यांच्या स्विफ्ट कार (एमएच १४, डीए ४७४१) सह रस्त्यावर पार्क केलेल्या अन्य दोन दुचाकींची तोडफोड केली. पुढे काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या सुनील गायकवाड नावाच्या व्यक्तीलाही मारहाण केली.