येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: March 12, 2024 05:18 PM2024-03-12T17:18:47+5:302024-03-12T17:30:31+5:30
मालकाला दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरतोय माहित असतानाही मुलाला फ्रिजवर चढून कप काढण्यास सांगितले
पिंपरी : फ्रिजच्या विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल केला. तळवडेतील टाॅवर लाइन येथी येवले चहाचे दुकान येथे सोमवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश जगताप, असे गुन्हा दाखल झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. प्रेमकुमार सिद्धाराम बनसोडे (४३, रा. मिलिंदनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेमकुमार यांच्या मुलाचे वय १७ आहे हे माहिती असूनही गणेश जगताप याने त्याला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरत असल्याचे गणेश याला माहिती होते. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत त्याने कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच फ्रिजमुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे कामगारांनी सांगितले. त्याकडेही गणेश जगताप याने दुर्लक्ष केले. तसेच फ्रिजची दुरुस्तीही केली नाही.दरम्यान, दुकान मालक गणेश जगताप याने फिर्यादी प्रेमकुमार यांच्या १७ वर्षीय मुलाला फ्रिजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे मुलाला विजेचा धक्का जोरदार बसला. त्यात मुलाचा मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर कामावर ठेवणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही म्हणून गणेश जगताप याच्यावर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.