महापालिका अधिकाऱ्यांची मुले रिंगणात
By admin | Published: February 15, 2017 02:16 AM2017-02-15T02:16:52+5:302017-02-15T02:16:52+5:30
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकीत आता राजकारण्यांसह महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही
पिंपरी / मंगेश पांडे
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकीत आता राजकारण्यांसह महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील गावकी-भावकीच्या राजकारणात माजी सहायक आयुक्त, शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांची मुलेही रिंगणात उतरून नशीब आजमावीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा श्रीमंत महापालिका असा लौकिक आहे. या महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. यासाठी मोठी चढाओढही असते. येथे अनेक वर्षांपासूनचे राजकारण गावकी-भावकी भोवती फिरत होते. मात्र, आता शहरातील उद्योग व्यावसायामुळे राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांबरोबर काही व्यावसायिक मंडळी राजकारण सहभागी होऊ लागले आहेत. त्यानंतर आता यामध्ये महापालिकेतीच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वीपासून त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडे फिल्डिंगदेखील लावली होती. त्यापैकी काही जणांच्या मुलांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे, तर काही जण अपक्ष म्हणून लढत आहेत.
महापालिकेतून सहायक आयुक्त पदावरून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले सुभाष माछरे हे काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, तर निवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची कन्या अश्विनी कांबळे या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे चिंरजीव आशिष रॉय हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.