सावत्र आई आणि सख्ख्या बापाच्या अमानुष छळाला कंटाळून घराबाहेर पडलेली मुले सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:43 IST2018-12-13T15:57:43+5:302018-12-13T16:43:04+5:30
सावत्र आई आणि सख्ख्या बापाने पोटाला लोखंडी सळईने चटके दिले. सहनशीलता संपल्याने दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घर सोडून निघाले.

सावत्र आई आणि सख्ख्या बापाच्या अमानुष छळाला कंटाळून घराबाहेर पडलेली मुले सापडली
पिंपरी: सावत्र आई आणि सख्ख्या बापाने दोन्ही मुलांना अमानुष मारहाण केली. तापलेल्या सळईने त्यांच्या पोटाला चटके दिल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. मनीषा सूर्यवंशी असे सावत्र आईचे नाव आहे. तर गुंडेराव सूर्यवंशी असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यांना अटक केली आहे.
आई,वडिलांच्या छळने त्रस्त झालेल्या चिमुकल्याचे नाव महेश तर मुलीचे नाव वैष्णवी असे आहे. घरातील साफ सफाई करत नाहीत, सांगितलेले ऐकत नाहीत. या कारणास्तव 7 वर्ष वयाच्या मुलांना लाकडी दांडके, लोखंडी सळईने मारहाण केली. सावत्र आई आणि सख्ख्या बापाने पोटाला लोखंडी सळईने चटके दिले. गेल्या पाच ते सहा महिन्या पासून महेश आणि वैष्णवी हा त्रास सहन करीत आहेत. सहनशीलता संपल्याने दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घर सोडून निघाले. शाळेच्या गणवेशात ते दोघेही घराबाहेर पडले. नाशिकफाटा येथे ते एस टी बसची चौकशी करू लागले. शाळेच्या गणवेशातील मुले कोणीही सोबत नसताना कोठे निघाली आहेत, अशी शंका तेथील नागरिकांना आली. विश्वासात घेऊन त्यांची विचारपुस केली त्यावेळी मुलांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती नागरिकांना दिली. काही जागरुक नागरिकांनी शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या मुलांना भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र आई आणि सख्ख्या बापाला बेड्या ठोकल्या.