मुलांच्या सुरक्षेबाबत राहावे दक्ष, बालकमृत्यूचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:15 AM2018-03-05T04:15:53+5:302018-03-05T04:15:53+5:30
बांधकामाच्या ठिकाणी आई, वडील कामात व्यस्त, लक्ष देणारे कोणी नाही, अशा ठिकाणी कधी हौदात पडून बालकांचा मृत्यू होतो, तर कधी इमारतीवरून पडून मजुरांची बालके दगावतात. ज्यांच्याकडे लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कोणी नाही, अशा ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात.
पिंपरी - बांधकामाच्या ठिकाणी आई, वडील कामात व्यस्त, लक्ष देणारे कोणी नाही, अशा ठिकाणी कधी हौदात पडून बालकांचा मृत्यू होतो, तर कधी इमारतीवरून पडून मजुरांची बालके दगावतात. ज्यांच्याकडे लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कोणी नाही, अशा ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. परंतु, आलिशान गृहप्रकल्पात असलेल्या सुखवस्तू कुटुंबात प्रशस्त जागा व नोकरचाकर असतानाही अशा घटना घडतात. तेव्हा मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
वाकड येथील एका सोसायटीत गॅलरीत खेळणारा कार्तिक हा दीड वर्षाचा बालक पाचव्या मजल्यावरून खाली पडून पाच महिन्यांपूर्वी दगावला. मागील महिन्यात काळेवाडीत इमारतीच्या दुसºया मजल्याच्या गॅलरीतून पडून रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नागरिकांच्या विस्मृतीत गेली नाही. अशातच चिंचवड मेट्रोपोलेटिन सोसायटीत राहणाºया तोमर कुटुंबातील दीड वर्षाच्या अनिका या चिमुकलीचा नवव्या मजल्याच्या गॅलरीतून खाली पडून अंत झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनांतून पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत योग्य दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बिगारी काम करणारे वडील सकाळी कामाला निघाले. पाठीमागे खाऊसाठी धावत येणारी आरती नावाची तीन वर्षांची चिमुकली ताथवडेतील ओम शिव कॉलनीत टेम्पोच्या धडकेत जिवाला मुकली. तर घराबाहेर गणपती मंदिराच्या शेडच्या सावलीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या सार्थकच्या अंगावरून गाडी गेल्याने तो मोटारीच्या चाकाखाली चिरडला गेला. ही हृदयद्रावक घटना ताथवडे येथील सुखदा कॉलनीत घडल्याची नोंद आहे.
थेरगावातील श्रीकृष्ण कॉलनीत दीड वर्षाच्या श्रीकृष्ण या बालकाचा मृत्यू झाला. ताथवडे येथे सहा महिन्यांच्या सार्थकला त्याच्या आजीने गणपती मंदिराच्या शेडमध्ये सावलीत आणले. सार्थकची आई स्वयंपाक करीत होती. त्याच वेळी शेजारीच राहणारा एक जण मोटार बाहेर काढत होता. मोटार मागे घेत असताना, मोटारीच्या मागील चाकाखाली
बाळ आले. काही कळण्याच्या आत
ते चिरडले गेले. अपघातांच्या
या घटनांचा तपशील दहा
महिन्यांचा आहे.
हौदात पडून बालकाचा मृत्यू
घरातील चुलीजवळ गेलेली कोमल नावाची पाच वर्षांची बालिका भोसरी येथे आगीच्या ज्वाळांनी होरपळून मृत्युमुखी पडली. भोसरी, दिघीत बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाºया मजुरांची मुले खेळताना पाण्याच्या डबक्यात पडून मृत्युमुखी पडल्याच्या
दोन घटना घडल्या. रहाटणीत हौदात पडून एक बालक दगावले.
आलिशान गृहप्रकल्पांतही सुरक्षेला नाही प्राधान्य
१अलिशान गृहप्रकल्पांमध्ये लाखो रूपये खर्च करून सदनिका खरेदी केल्या जातात. अंतर्गत सजावटीसाठी (इंटरिअरसाठी) मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, धोकादायक ठरणाºया गॅलरींना संरक्षण जाळी बसविण्याच्या खर्चाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते. गॅलरीत थांबल्यास ऊन लागू नये, पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी लोखंडी अँगल बसवुन पत्रे लावले जातात. परंतु दोन ते अडिच फुट उंचीचा गॅलरीचा कठडा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे अनेकांना भान राहत नाही. लाखो रूपये खर्च करून घेतलेल्या सदनिकेत कुटूंबाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने दक्षता घेणेही तितकेच महत्वाचे ठरणारे आहे.
बांधकाम व्यावसायिकांचेही दुर्लक्ष
२शहरातील मोठे गृहप्रकल्प उभारणाºया बांधकाम व्यवसायिकांनी इमारतीची रचना करताना, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून गॅलरीची उंची निश्चित करणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या बांधकाम नियमावलीत अशी तरतूद नसेल, तर छोट्या उंचीच्या गॅलरी धोकादायक ठरू शकतात. ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. नियमावलीत
आवश्यक त्या दुरूस्ती करण्याची त्यांच्याकडून मागणी होणे अपेक्षित आहे.
इमारत बांधून सदनिका विक्री केल्यानंतर आपली जबाबदारी संपली. असाच
समज काही बांधकाम व्यवसायिकांचा झाला आहे. इमारतीचा ताबा
सोसायटीकडे दिल्यानंतर तेथील सदनिकाधारकांना इमारतीच्या रचनेत
बाहेरून कोणताही बदल करता येत नाही. बाल्कनी, गॅलरींमध्ये काही
करायचे तरी ते नियमबाह्य ठरते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकांनीच दक्षता घेतल्यास दुर्घटना नियंत्रणात येण्यास मदत होईल.