Chinchwad By Election | अखेर प्रचाराच्या फेऱ्या थंडावल्या; पोटनिवडणुकीत २८ जण रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:53 AM2023-02-25T09:53:37+5:302023-02-25T09:54:33+5:30
जाहीर प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या....
पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा संपला. शेवटच्या फेरी, दिवशी रॅली, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेठीवर उमेदवारांनी भर दिला. जाहीर प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत २८ जण उभे आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पक्षाच्या, तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदार संवादावर फेऱ्यांवर भर दिला. दुपारी कडाक्याचे ऊन होते, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. दुचाकी फेरी, चारचाकी फेरी काढून सर्वांनी शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळी सहाला प्रचार संपला.
प्रचार साहित्य आणि स्लिप वाटण्यावर भर
उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दिवशी प्रचार पत्रके वाटण्याबरोबरच स्लिप मतदारापर्यंत कसे पोहोचविता येतील, यासाठी प्रयत्न केले, तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रीय आणि पोलिंग बुथ निर्माण करण्याचे नियोजन केले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जाहीर प्रचार संपल्यानंतर चिंचवड विधानसभेची प्रवेशद्वार असणाऱ्या पिंपरी पूल, एम्पायर पूल, बिजलीनगर पूल, कासारसाई रस्ता, हिंजवडीतून वाकडमध्ये येणारा रस्ता. महामार्गावरून भोईरनगर आणि चिंचवडगावात येणारा रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशन रस्ता, किवळे रस्ता, सांगवी रस्ता, दापोडी रस्ता, बालेवाडीकडून पिंपळेनिलखला येणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त तैनात केला आहे. विद्यापीठाकडून दापोडीत येणारा रस्ता अशा विविध रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.
भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जगताप यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. शंकर जगताप यांनी पिंपळेनिलखमध्ये पदयात्रा काढली. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी शीतल काटे यांनी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात रॅली काढली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दुचाकी रॅली काढली. या फेरीची सुरुवात चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून झाली.