Chinchwad By-Election| भाजप अन् राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा फोल : राहुल कलाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:19 PM2023-02-21T15:19:06+5:302023-02-21T15:20:19+5:30
विकासाच्या वल्गना करणाऱ्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी...
पिंपरी :चिंचवड मतदारसंघात जीवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे, हे स्पष्ट होते. विकासाच्या वल्गना करणाऱ्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, असे आव्हान अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिले.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे. यावेळी कलाटे म्हणाले, चिंचवड मतदारसंघाचा १३ वर्षांत सर्वांगीण विकास झाला नाही. मतदारसंघातील उपनगरे विकासापासून वंचित आहेत. वाहतूक आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. मागील पाच वर्षे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना विकासकामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांची जास्त चर्चा झाली. टक्केवारीच्या राजकारणापायी शहराची विभागणी केली. या विभागणीमुळे शहर मागे पडले.
शिवजयंती महोत्सवास उपस्थिती
अनेक भागातील मंडळांना भेटी देत तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज यांच्याप्रती आदर व्यक्त केला. रावेत, काळेवाडी, रहाटणी, कोकणे चौक, वाकड तसेच विविध भागांतील मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. वाल्हेकरवाडीमधील श्री विठ्ठल तरुण मंडळ व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला.