Chinchwad By-Election | चिंचवडची लढत होणार तिरंगी; राहूल कलाटे लढण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:25 PM2023-02-10T15:25:01+5:302023-02-10T15:31:39+5:30
हुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे...
पिंपरी : शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वाकडमध्ये दाखल झाले होते. बंद दाराआड चर्चाही झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राहूल कलाटे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आज सकाळपासून बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते.
चिंचवडमधील बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलेले नाही. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतलेली नाही. त्यांच्या कचेरीतून ते गायब झालेले आहेत. ते नक्की कुठे गेले आहेत. माघारी घेण्याविषयी भूमिका काय आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळू शकत नाही. त्यांची समजूत काढण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजोग पाटील दाखल झालेले होते.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत-
चिंचवड विधानसभा निवडणूक राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीची वेळ दुपारी तीन पर्यंत होती. मात्र, शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे चिंचवडची लढत तिरंगी होणार आहे. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत होणार आहे.
दुपारी एक वाजता मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर भेगडे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे कलाटे यांची मनधरणी करत आहेत. योगेश बहल म्हणाले, '' कलाटे यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, त्यांनी माघार घ्यावी. यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे.''