Chinchwad By-Election | पोटनिवडणुकीमुळे अनेकांना मिळाला रोजगार; लाखो रुपयांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:17 PM2023-02-21T19:17:00+5:302023-02-21T19:17:00+5:30

या पोटनिवडणुकीमुळे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे...

Chinchwad By-Election | Many got employment due to by-election; A turnover of lakhs of rupees | Chinchwad By-Election | पोटनिवडणुकीमुळे अनेकांना मिळाला रोजगार; लाखो रुपयांची उलाढाल

Chinchwad By-Election | पोटनिवडणुकीमुळे अनेकांना मिळाला रोजगार; लाखो रुपयांची उलाढाल

googlenewsNext

रावेत (पुणे) : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे शहरातील हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. परिणामी बाजारातही चैतन्य आले आहे. चिंचवड निवडणुकीत प्रचाराने जोर धरला आहे. स्थानिक उमेदवार, स्थानिक मतदार यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या पोटनिवडणुकीमुळे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे.

सध्या अनेकांना या पोटनिवडणुकीमुळे अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील सात-आठ दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेसाठी आणि इतर कामकाजासाठी मनुष्यबळ वाढले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे मजूरवर्गासह प्रिंटिंग व्यावसायिक, स्पिकर मंडप, फेटेवाला, केटरिंग व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, फूल व्यावसायिक आदींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्या माध्यमातून बाजारातही उलाढाल वाढली आहे.

प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज

प्रचार रॅलीत गर्दी दिसावी, प्रचारपत्रक वाटप करणे, मतदारांच्या वोटर स्लिप घरोघरी पोहोचविणे, यासाठी विविध राजकीय पक्षांतर्फे आणि अपक्ष उमेदवारांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोजंदारीवर महिला व पुरुषांना घेतले जात आहे. यामध्ये पक्षाची पट्टी गळ्यात टाकायची अन् घोषणा देणे व मागे फिरणे एवढेच काम करावे लागत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा असते. काहीजण मध्येच रॅलीत केवळ फिरणे एवढेच काम असते. उमेदवाराकडून नास्ता आणि जेवणाची सोय राहत असल्यामुळे उत्साहात सहभागी होत आहेत, तर काही जणमध्येच कलटी मारून निघून जात असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना त्यांना परत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

मजूर अड्डे ओस

दररोज सकाळी सकाळी शहरातील विविध भागांतील गजबजून असणारे मजूर अड्डे सध्या मात्र सुनेसुने दिसत आहेत. दररोज मजुरी काम करून मिळणाऱ्या पैशापेक्षा निवडणुकीत प्रचार करून अधिक पैसे मिळत असल्याने इतर कामांना मजूर मिळत नाहीत. दररोज मजुरी करणाऱ्यांना प्रचारासाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे कामावर मजूर दांड्या मारत आहेत. अनेक ठेकेदार यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. बेरोजगार तरुणांचा कल सध्या प्रचार रॅलीतील कामात असल्याचे दिसून येत आहे.

मंडप, खुर्चीसाठी बुकिंग

विविध उमेदवारांनी जागोजागी प्रचार कार्यालय थाटण्यात आल्याने मंडपवाल्यांना चांगले दिवस आले आहेत. याशिवाय दररोज कुठे ना कुठे कॉर्नरसभा, जाहीरसभा यामुळे माइक सिस्टिम, खुर्च्या, स्टेज, डेस्क, लाइट यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स चालकांची सध्या आनंदाचे वातावरण आहे.

रिक्षांच्या चाकांना आर्थिक गती

रिक्षाचालकांच्या चाकांना प्रचारामुळे वेग आला असून, दिवसभराची चांगली कमाई होत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा बार उडल्यानंतर रिक्षाचालकांच्या चाकाला आर्थिक गती मिळाली आहे. विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी १००हून अधिक रिक्षा व्यावसायिक सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. रिक्षाला बॅनर आणि फ्लेक्स लावून त्यांचा प्रचार सुरू आहे. हाताला काम मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेवणावळी हाऊसफुल्ल

प्रत्येक उमेदवाराला दररोज किमान ५००हून अधिक कार्यकर्त्यांना जेवण द्यावे लागत आहे. याशिवाय प्रभागातील मतदारांसाठीची जेवणावळ वेगळी. यामुळे हॉटेल्स, खाणावळ सध्या हाऊसफुल्ल आहेत. तेथे नियमित काम करणारे कामगार व वेटर यांच्या व्यतिरिक्त जादा कामगारांना कामासाठी लावावे लागत आहे. या कामगारांनाही दररोज जास्त रोजगार मिळत आहे. या व्यतिरिक्त बॅनर्स, स्टिकर, झेंडे बनविणारे, डिझाइन बनविणारे यांनादेखील रोजगार मिळाला आहे. या सर्व माध्यमांतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हा सर्व पैसा साहजिकच बाजारात येत असल्यामुळे बाजारातील उलाढालही कमालीची वाढली आहे.

निवडणुकीच्या प्रचार सभेच्या वेळी उमेदवार, स्टार प्रचारक आणि प्रमुख कार्यकर्त्यांसाठी फेटे बांधण्यासाठी फेट्यांची मागणी वाढली आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या पक्षांच्या सभा होत असल्याने सर्वच ठिकाणी फेटे बांधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जरी धावपळ होत असली तरी कमाई मात्र चांगली होत आहे.

- दीपक उकिरडे (फेटेवाला, काळेवाडी)

माझा मागील अनेक वर्षांपासून केटरिंगचा व्यवसाय आहे. एकीकडे लग्नसमारंभासह इतर लहान-मोठ्या कार्यक्रमाच्या जेवणावळीची ऑर्डर असताना त्यामध्ये निवडणुकीच्या जेवणावळीची भर पडली असल्याने व्यवसाय करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिक ऑर्डर असल्याने मनुष्यबळ जुळवताना जिकरीचे होत आहे, मात्र यामधून मिळणारे उत्पन्न समाधानकारक आहे.

- नामदेव सपकाळ (केटरिंग व्यावसायिक, ताथवडे)

Web Title: Chinchwad By-Election | Many got employment due to by-election; A turnover of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.