चिंचवड पोटनिवडणुकीत 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'; १० हजारांची चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 07:32 PM2023-02-07T19:32:02+5:302023-02-07T19:40:14+5:30
मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांची गर्दी झाली होती...
- प्रकाश गायकर
पिंपरी :चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता इच्छुकांची तोबा गर्दी झाली. प्रमुख पक्षांसोबतच काही छोटे पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने तब्बल दहा हजार रुपयांची रक्कम अर्ज शुल्क म्हणून आणली. ती मोजताना अधिकाऱ्यांनाही घाम फुटला, तर यामुळे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाची अधिकाऱ्यांना आठवण झाली.
मंगळवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत होती. या मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांची गर्दी झाली होती. त्यामध्ये रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. डिपॉझिट भरण्यासाठी त्यांनी तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर आणली होती. एक बॅग भरून आणलेल्या या चिल्लरमध्ये एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी होती.
महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. अर्ज भरण्यासाठी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. त्यामुळे सर्वच इच्छुकांना घाई झाली होती, तर अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरू होती. त्यामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर अधिकाऱ्यांना मोजावी लागल्याने त्यांचेही धाबे दणाणले. पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल एक तास लागला. त्यामध्येच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकृतीसाठी घाई सुरू असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे मोजताना घाम फुटला होता. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटामध्ये देखील नायक आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डिपॉझिटची रक्कम चिल्लर स्वरुपामध्ये जमा करतो. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वच निवडणूक यंत्रणेची धावाधाव होते. त्याचीच प्रचिती मंगळवारी निवडणूक कार्यालयामध्ये आली.
चिंचवड पोटनिवडणुकीत 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'; १० हजारांची चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना घाम#Punepic.twitter.com/2CWJlKy6TH
— Lokmat (@lokmat) February 7, 2023
तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय झाले पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक लढवण्यासाठी मी पैसे जमा करत होतो. ही दहा हजार रुपयांची रक्कम मी साचवलेली आहे. त्यामधूनच मी निवडणूक लढणार आहे.
- राजू काळे, उमेदवार.