Chinchwad By Election | चिंचवडमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:03 PM2023-02-27T12:03:50+5:302023-02-27T12:04:34+5:30
भाजपचे चिंचवड विधानसभेतील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली...
पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. मात्र, रात्री ८.१५ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगा असल्याने मतदान ५० टक्के होण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी सायंकाळी व्यक्त केला.
भाजपचे चिंचवड विधानसभेतील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणूक असतानाही भाजप व महायुतीचे, तसेच महाविकास आघाडीचे राज्यातील ज्येष्ठ नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व युवानेते अदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली.
पोटनिवडणुकीसाठी ५ लाख ६७ हजार मतदान होते. मतदाना दिवशी रविवार असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होण्याचा अंदाज होता. सकाळपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ ३० टक्के मतदान झाले होते. मात्र, उरलेलेल्या तीन तासांत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची वाढलेली टक्केवारी ५० टक्केपेक्षा अधिक होण्याचा अंदाज व्यक्त केला.