चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणूक: पोलिसांकडून १० आरोपींना अटक, १२ तडीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:13 AM2023-02-25T11:13:54+5:302023-02-25T11:15:02+5:30
संवेदनशील केंद्रांवर जास्तीचा बंदोबस्त....
पिंपरी : विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे. उपद्रवी ६७७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोम्बिंग ऑपरेशन करून शस्त्र जप्त केले. पाहिजे असलेल्या दहा आरोपींना अटक करून बाराजणांवर तडीपारीची कारवाईदेखील केली. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी चिंचवड, सांगवी, हिंजवडी, वाकड, देहूरोड व रावेत या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मतदान केंद्र राहणार आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानप्रक्रिया भयमुक्त व निष्पक्षपाती व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. समाजविघातक कृत्य करणारे, कायदा मोडणाऱ्या ६७७ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच दारूविक्री करणाऱ्या १५१ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तीन लोकांवर कारवाई केली. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १९ अग्निशस्त्रे, ८९ कोयते व तलवारी जप्त केल्या. तसेच १० वॉण्टेड आरोपींना अटक केली. १२ गुन्हेगारांना तडीपार केले. मोका, एमपीडीएसारख्या कारवाया केल्या. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
संवेदनशील केंद्रांवर जास्तीचा बंदोबस्त
शहरात पोलिसांकडून २४ ठिकाणी २४ तास नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू आहे. तसेच १४ भरारी पथके तैनात आहेत. सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संवेदनशील ठिकाणी एकूण १८ वेळा केंद्रीय पोलिस दलाच्या मदतीने संचलन करण्यात आले. संवेदनशील असलेल्या १८ मतदान केंद्रांवर जास्तीचा पोलिस बंदोबस्त दिला आहे. संशयितांच्या हालचालींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांकडून ३५६ पिस्टल जमा
स्वसंरक्षणार्थ काही नागरिकांनी शस्त्र परवाना घेतलेला आहे. त्यांच्याकडील परवाना असलेले पिस्टल किंवा इतर शस्त्र पोटनिवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडू शकते, त्यामुळे अशा ३५६ परवानाधारकांचे पिस्टल निवडणूक काळासाठी पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
कलम १४४ लागू
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील व्यावसायिक दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक सेवावगळून) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश जारी केले आहेत.