चिंचवड मतदारसंघाने केले ‘पवनाथडी जत्रे’ला हायजॅक; राजकीय नेत्याचा प्रशासनावर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 08:02 PM2021-02-16T20:02:12+5:302021-02-16T20:02:37+5:30

पिंपरी, भोसरीतील नागरिकांकडून संताप; दरवर्षी सांगवीतच होते आयोजन 

Chinchwad constituency hijacks 'Pavanathadi Jatra'; Political leader puts pressure on administration | चिंचवड मतदारसंघाने केले ‘पवनाथडी जत्रे’ला हायजॅक; राजकीय नेत्याचा प्रशासनावर दबाव

चिंचवड मतदारसंघाने केले ‘पवनाथडी जत्रे’ला हायजॅक; राजकीय नेत्याचा प्रशासनावर दबाव

googlenewsNext

पिंपरी : शहरातील महिला बचत गटांसाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिला बाल कल्याण अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. शहरातील विविध भागात त्याचे आयोजन अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही जत्रा सांगवी येथेच होत आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघानेच ‘जत्रा’ हायजॅक केल्याचे दिसून येते. 

महापालिका हद्दीतील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघात दरवर्षी ही जत्रा आयोजित करणे अपेक्षित आहे. मात्र असे न होता चिंचवड मतदारसंघात सांगवी येथेच जत्रा होते. त्यामुळे इतर भागातील महिला बचत गटांना या जत्रेतून उत्पादन विक्रीसाठी संधी मिळत नाही. परिणामी या जत्रेचे स्वरुप केवळ विधानसभेच्या एका मतदारसंघातील काही भागापुरता मर्यादित झाल्याचे दिसून येते.

पिंपरी, भोसरीतील नागरिकांकडून संताप
‘पवनाथडी जत्रा’ हा शहरस्तरावरील उपक्रम आहे. त्यामुळे दरवर्षी त्याचे विविध भागात आयोजन करण्याची मागणी होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिका प्रशासनावर शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांचा दबाव असून, त्यांच्याच भागात दरवर्षी जत्रा व्हावी, असा त्या नेत्याचा अट्टाहास असतो. अधिकारी दबावाखाली सांगवी येथेच आयोजन करतात. त्यामुळे पिंपरी व भोसरी तसेच शहरातील इतर भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.   

मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करावे
बचतगटांना फायदा होईल तसेच नागरिकांना आनंद घेता यावा, यासाठी पवनाथडीचे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून करण्यात आली आहे. पक्षाच्या शहर सचिव सीमा बेलापूरक, अश्विनी बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, दक्षता क्षिरसागर, सुजाता काटे, अंजना कोकाटे, दुर्गा पवार, अनिता नाईक, काजल गायकवाड, श्रद्धा देशमुख, उषा जगताप, सीमा परदेशी यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.  

पवनाथडी जत्रेचा तपशील
वर्ष             ठिकाण                                     खर्च (रुपयांमध्ये)
२०१४-१५    पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी         ४८ लाख ८४ हजार २१५
२०१५-१६    एचए मैदान, पिंपरी                  ५९ लाख ३९ हजार ३४८
२०१६-१७    गावजत्रा मैदान, भोसरी            ५४ लाख एक हजार १५०
२०१७-१८    पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी         ५१ लाख ५० हजार ९८३
२०१८-१९    पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी         ६३ लाख २२ हजार ९७७
२०१९-२०  पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी          ४५ लाख (उपलब्ध तरतूद) 

Web Title: Chinchwad constituency hijacks 'Pavanathadi Jatra'; Political leader puts pressure on administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.