चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची उतरविली नशा; ३८ मद्यपींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:00 PM2018-01-01T18:00:42+5:302018-01-01T18:03:53+5:30
ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली.
चिंचवड : ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेत अशा वाहन चालकांची नशा उतरविली.
चिंचवड मधील विविध चौकात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम राबविली. शनिवारी केलेल्या कारवाईत १६ दुचाकी व एक रिक्षा चालकांवर मद्यपान करून वाहन चालविण्याचा खटला भरला. रविवारी रात्री वाल्हेकरवाडी व थेरगाव पुलाजवळ नाका बंदी करून २१ दुचाकी व ४ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई केली. नववर्षाच्या उत्साहात हुल्लडबाजी करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती.
मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी चिंचवडमधील विविध ठिकाणी चेक पॉर्इंट उभारण्यात आले होते. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतरही मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात नाकाबंदी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. लोंढे यांच्या सह कर्मचारी एस. बी. मगर, एस. डी. आफळे, टी. एस. महात, बी. ए. गायकवाड, जे. बी. भामरे, एफ. आर. इनामदार, एस. डी. म्हस्के यांनी ही कारवाई केली.