चिंचवड : बावीस दिवसांत १०० जणांवर हल्ला, कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:08 AM2018-01-25T05:08:48+5:302018-01-25T05:09:14+5:30
पालिका प्रशासनाने शहरातील कुत्री पकडण्यासाठी ३ संस्थांना नियुक्त केले आहे. मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे २२ दिवसांत १०२ नागरिक जखमी झाल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघड झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य झाली की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चिंचवड : पालिका प्रशासनाने शहरातील कुत्री पकडण्यासाठी ३ संस्थांना नियुक्त केले आहे. मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे २२ दिवसांत १०२ नागरिक जखमी झाल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघड झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य झाली की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील विविध भागांत भटकी कुत्री सहज दृष्टिपथास येत आहेत. कचराकुंड्यांपासून ते गल्लीबोळातील रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तीन संस्थांना कुत्री पकडण्याचा
ठेका दिला आहे. वॉर्डनिहाय याची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजून एका संस्थेला यात समाविष्ट करण्याचा विचार सध्या या विभागात सुरू आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. यानंतर त्यांना पुन्हा सोडून दिले जाते. मात्र या प्रक्रियेत सावळा गोंधळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. चिंचवडमध्ये चालू वर्षातील २२ दिवसांत १०२ नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद पालिकेच्या तालेरा रुग्णालयात झाली आहे.
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कित्येक भागात वर्षभरापासून कुत्री पकडणारी यंत्रणा आली नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ज्या संस्थांना कुत्री पकडण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने समस्या वाढत आहेत. याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात व भटक्या कुत्र्यांचे होणारे हल्ले रोखण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.