चिंचवडला ‘कट्यार’चा होणार सुवर्णमहोत्सव
By Admin | Published: April 29, 2017 04:03 AM2017-04-29T04:03:00+5:302017-04-29T04:03:00+5:30
पिंपरी-चिंचवडच्या सांगीतिक चळवळीचा मानदंड असणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या वतीने ५ ते ७ मे रोजी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या सांगीतिक चळवळीचा मानदंड असणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या वतीने ५ ते ७ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. या वेळी स्वर, शब्द आणि अभिनयाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचा सुवर्णमहोत्सवही साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीनदिवसीय महोत्सव दररोज सायंकाळी साडेसहा या वेळेत होणार आहे. या विषयी डॉ. घांगुर्डे म्हणाले, ‘‘संस्थेच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या संगीत महोत्सवाचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर शुक्रवारी भाग्येश मराठे, प्रथमेश लघाटे, डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे गायन, धनश्री नातू यांचे कथक, शनिवारी आदित्य मोडक, गंधार देशपांडे यांचे गायन, स्वीकार कट्टी यांचे सतारवादन, अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन, आदित्य ओक यांचे संवादिनीवादन, सुनील अवचट यांचे बासरीवादन, स्वरांगी मराठे, शामिका भिडे यांचे सहगायन सादर होणार आहे. रविवारी महोत्सवाची सांगता होणार असून, नादब्रह्म, पुणे निर्मित ‘संगीत कट्यार काळजात घुसली’चा प्रयोग सादर होणार आहे. महोत्सवात गायन, वादन आणि नृत्य सादर होणार आहे. सुवर्णमहोत्सवी नाटकांचाही प्रयोग या वेळी सादर होणार आहे.’’
पत्रकार परिषदेस विश्वस्त नाना दामले, विनीता रायकर, वरद पुरंदरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)