वडगाव मावळ येथील अवजड दगड गोटे उचलण्याच्या स्पर्धेत चिराग वाघवले विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:43 PM2019-03-21T16:43:04+5:302019-03-21T16:44:47+5:30
वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराच्या पटांगणात ८५ किलो वजनाची गोटी मानेवर ठेवून १३२ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकाविला.
वडगाव मावळ : पारंपरिक पद्धतीने धूलवडीचा सण साजरा करण्यासाठी वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबामहाराज मंदिराच्या पटांगणात गोल आकाराचे दगडांचे मोठे गोटे उचलून बैठका मारण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. स्पर्धेत सह्याद्री जिमखान्याचा चिराग संतोष वाघवले याने ८५ किलो वजनाची गोटी मानेवर ठेवून १३२ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकाविला.
तहसीलदार रणजीत देसाई व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नगराध्यक्ष मयूर ढोरे, गणेश ढोरे, बाळासाहेब नेवाळे, भास्करराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, बिहारीलाल दुबे, विठ्ठल भोसले, सुनील चव्हाण, रवींद्र यादव, दत्तात्रय कुडे, अनंता कुडे, किरण भिलारे, सुधारक ढोरे आदी या वेळी उपस्थित होते. जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने शुभम तोडकर, रुचिका ढोरे व किरण चिमटे, किशोर ढोरे यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
८५, ९५ व ११५ किलो वजनाच्या गोल दगडांचे गोटे उचलण्याचा प्रयत्न फ्रेण्ड्स जिमखाना, सह्याद्री, जय बजरंग तालीम मंडळ, दुबे गुरुकुलच्या खेळाडूंनी केला. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या वाघवले यांचा ग्रामस्थांतर्फे १५ हजार रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. गणेश विनोदे, सुनील चव्हाण, विकी म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले.
८० किलो वजनाची गोटी खांद्यावर घेऊन बैठका मारणारे खेळाडू
प्रथम - चिराग वाघवले (१३१ बैठका), द्वितीय - किशोर धोत्रे (५६), तृतीय - सौरभ ढोरे (५५). हृषीकेश चव्हाण (५४), महेंद्र सुर्वे (४०), गोकुळ काकडे (४३), मच्छिंद्र कराळे (२५), अमृता जाधव (३२), मयूर चव्हाण (२१), गजकुमार भिलारे (२०), अजिंक्य कुडे (८) आदींनी यशस्वी प्रयत्न केले.
बैठका : वडगाव मावळ येथे ८५ किलो वजनाची दगडाची गोटी मानेवर ठेवून १३१ बैठका मारणारा चिराग वाघवले.